अमळनेर : फलक नसलेल्या मोरीच्या कामाच्या ठिकाणी वळण रस्त्यावर कार सरळ पाण्याच्या मोठ्या डबक्यात जाऊन पडली. ही घटना २१ रोजी रात्री ११ वाजता अमळनेर -धुळे रस्त्यावर जानवे ते लोंढवे दरम्यान घडली. प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याने त्यांचा जीव वाचला आहे.अमळनेर- धुळे रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी नाल्यांवर मोरी बांधण्याचे काम सुरू आहे, त्याठिकाणी वळण रस्त्याचे फलक, कठडे, रेडियम लावणे गरजेचे असताना काही ठिकाणी फलक व रेडियम कठडे नाहीत.त्यामुळे वाहने घसरून डबक्यात पडल्याने अनेक किरकोळ अपघात झाले आहेत.२१ रोजी रात्री काळखेडे येथील बबलू अर्जुन मोरे यांच्या मालकीची चारचाकी (एम.एच.१८/ बी. सी. ९५७४) सप्तशृंगी गडावरून अमळनेरकडे येत असताना जानवे ते लोंढवे दरम्यान वळण रस्त्याचा फलक न दिसल्याने व पर्यायी रस्ता सुरक्षित नसून तो डबक्याच्या बाजूने जात असल्याने चारचाकी खड्ड्यात जाऊन पडली. सततच्या पावसाने खड्ड्यात पाणी साचल्याने कार पाण्यात अर्धी बुडाली.या गाडीत तीन पुरुष व दोन स्त्रीया होत्या. सुदैवाने त्याचवेळी जानवे येथील पोल्ट्री फार्मवरील सुरेश पाटील घरी जात असल्याने त्यांना घटना दिसली म्हणून त्यांनी ताबडतोब सर्व पाचही प्रवाश्यांना बाहेर काढले. चालक तेथून पसार झाल्याचे समजते. घटना घडली असताना वेळीच मदतीला सुरेश पाटील आले नसते तर कार पाण्यात बुडून प्रवाशांचा जीव गुदमरून अनर्थ घडला असता. दरम्यान ठेकेदाराकडून सकाळी त्या जागेवर वळण रस्त्याचा फलक लावण्यात आल्याचे जानवे ग्रामस्थांनी सांगितले.
कार जाऊन पडली भल्या मोठ्या डबक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 9:25 PM