जळगाव : सकारात्मक बदल आणि शिस्तीमुळे चर्चेत आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची केंद्राच्या निती आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाच्या कार्यक्षमता चाचणीत रुग्णालयाची कामगिरी सर्वोत्त असल्याचे पत्र प्रशासनाला गुरूवारी प्राप्त झाले आहे. राज्यातील सहा रुग्णालयांमध्ये ब प्रवर्गात जळगाव रुग्णालयाला स्थान मिळाले आहे. प्रशासनाने नेमकी काय कामे केली याची माहितीही आयोगाने तातडीने मागितली आहे.
अ’ प्रवर्गामध्ये उपजिल्हा रुग्णालय, कुडाळ जि.सिंधुदुर्ग, जिल्हा रुग्णालय, सातारा तर ‘ब’ प्रवर्गात ठाणे रुग्णालय, अहमदनगर व जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचा समावेश आहे. यात कुडाळ हे छोटे रुग्णालय, त्यानंतर सातारा, ठाणे, नगर हे २०० ते ३०० खाटांच्या मध्यम रुग्णालयांच्या श्रेणीत तर एकमेव जळगावचे शासकीय रुग्णालय हे ३०० पेक्षा जास्त खाटांच्या क्षमतेचे मोठे रुग्णालय या श्रेणीत केंद्र सरकारच्या चाचणीत समाविष्ट झाले आहे. निती आयोगाचे अतिरिक्त सचिव राकेश सरवाल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव प्रदीपकुमार व्यास यांचे पत्र रुग्णालय प्रशासनाला मिळाले आहे. रुग्णालयात सध्या कोविडसाठी स्वतंत्र आणि नॉन कोविड स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वयीत आहे.
जीएमसीत अशी आहे यंत्रणा
एकूण बेड - ४५०
कोविडसाठी स्वतंत्र - १००
अतिदक्षता विभाग - ३ (४० बेड)
व्हेंटीलेटर्स- १०० पेक्षा अधिक
सर्व अतिदक्षता विभागात डिजिटल मॉनिटर, पोर्टटेबल एक्सरे अत्याधुनिक मशिनरी आहे, अनेक विभाग कात टाकत आहेत.
चाचणी झाली कशी ?
केंद्र सरकारच्या निती आयोगाने देशातील सर्व जिल्हा रुग्णालयांची कार्यक्षमता चाचणी केली होती. यात तीन निकष ठरविण्यात आले होते. त्यात २०० पेक्षा कमी खाटा लहान, २०० ते ३०० खाटा मध्यम, तर ३०० पेक्षा अधिक खाटा मोठे रुग्णालय या तीन निकषाच्या आधारे ही चाचणी झाली. मात्र, यासाठी कुठलीही समिती रुग्णालयात आली नव्हती, किंवा ऑनलाईन कुठली माहिती मागविण्यात आली नव्हती, त्यामुळे चाचणी नेमकी कशी झाली याची माहिती न देता थेट पत्र प्राप्त झाले आहे. मात्र, शासनाकडे नियमीत देण्यात येणाऱ्या आकडेवारीवरून आयोगाने ही माहिती संकलीत केल्याचे सांगितले जात आहे.
कोट
निती आयोगाचे पत्र आज प्राप्त झाले. रुग्णालयात नेमक्या काय सुविधा, काय उपाययोजना केल्या याची माहिती मागविली आहे. येत्या दोन दिवसात ती माहिती देऊ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला ही मोठी उपलब्धी मिळाली आहे. - डॉ. जयप्रकाश रामानंद,
निती आयोग?
नीती आयोग अर्थात नॅशनल इंस्टीटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया होय. विकासाची धोरण ठरविणारी ही शिखर संस्था असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. जळगाव रुग्णालयाने कशा सुविधा दिल्या याची माहिती मागवून अन्य ठिकाणी त्याचा वापर करून रुग्णालयांमध्ये कशा सुधारणा करता येईल, हा या मागचा उद्देश असल्याचे समजते.