महामार्गावर कैरी बाजार जोरात भरला होता. यामुळे सकाळी ६ ते १२ यादरम्यान खूप गर्दी झाली होती. वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. वाहतूक ठप्प झाली होती. कोरोनाच्या काळात दुकानदारावर कारवाईचा बडगा उगारणारे पालिका कर्मचारी हे यावेळी उपस्थित असताना ते मूग गिळून गप्प होते. बाजार भरण्यास बंदी असताना त्यांनी मग आता नियम धाब्यावर का बसविले? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
यावेळी महामार्गाच्या बाजूला कैरी, लोणचे साहित्य विक्रीसाठी एवढी गर्दी असताना या कर्मचाऱ्यांनी बघ्याची भूमिका का घेतली? असा प्रश्न नागरिकांना पडला. बाजारपेठेतही आठवडा बाजार नेहमीप्रमाणे मोठ्या गर्दीने भरला होता. भाजीपाला लिलावातही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहण्यास मिळाली. आठवडा बाजार भरण्यास बंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः काढले होते. मग त्या आदेशाला मात्र केराची टोपली स्थानिक प्रशासनाकडून दाखविली गेली. या गर्दीतून उद्या ‘डेल्टा प्लस’चा संसर्ग झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आठवडा बाजार भरला गेला. गर्दीचा उच्चांक झाला, मग एवढी बेफिकिरी कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आठवडा बाजार न भरण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना बाजार भरलाच कसा? याबाबत विचारणा केली असता महसूल प्रशासनाने पालिका प्रशासनाकडे तर पालिका प्रशासनाने पोलीस प्रशासनाकडे तर पोलीस प्रशासनाने महसूल प्रशासनाकडे बोट दाखविला. बाजारपेठेतही खूप गर्दी दिसून आली.
छाया : पारोळा महामार्गालगत भरलेला कैरी बाजार व झालेली गर्दी.