आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२८ : शनी पेठ पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक बी.बी.शिंदे यांच्या कारची पिंप्राळ्यात दगडाने काच फोडण्यात आली तर कानळदा रस्त्यावर रेणुका मंदिराजवळ डॉ.मुबीन अशरफी यांची कार पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. एकाच रात्री घडलेल्या या दोन घटनांमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
उपनिरीक्षक शिंदे हे पिंप्राळा येथील शंकर अप्पा नगरात रहायला आहेत. वॉलकंपाऊडच्या बाहेर त्यांची लाल रंगाची कार (क्र.एम.एच.०२ डी.डी.८१५७) लावण्यात आली होती. शिंदे हे बुधवारी रात्री बारा वाजता ड्युटी आटोपून घरी गेले तेव्हा कार सुस्थितीत होती. सकाळी साडे सहा वाजता शेजारी राहणाºया राजस्थानी लोकांना त्यांच्या कारची काच फुटलेली दिसली, त्यांनी ही बाब शिंदे यांना सांगितली. कारची पाहणी केली असता मोठा दगड स्टेअरींगच्या सीटवर पडलेला होता तर मागच्या बाजूचीही काच फोडण्यात आली होती. शिंदे हे अहमदनगर येथे कार्यरत होते, चार महिन्यापूर्वीच त्याची जळगावात बदली झाली आहे. त्यामुळे त्यांचा कोणाशीही वाद नव्हता. पत्नी आजारी असल्याने रात्री अपरात्री दवाखान्यात जाण्याची वेळ येते म्हणून कार घराबाहेरच लावण्यात आली होती व त्यावर कापडही झाकण्यात आला नव्हता, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
डॉ.मुबीन अशरफी यांची कार (क्र.एम.एच.०३ एस.८८२६) दुसºयांदा जाळण्यात आली. चार महिन्यापूवीर्ही त्यांची हीच कार जाळण्यात आली होती. आता मध्यरात्री अडीच वाजता कार जळत असल्याचे लक्षात आल्यानंतर पाणी टाकून आग विझविण्यात आली. कारचे मोठे नुकसान झाले आहे. शेजारीच पेट्रोलची बाटली आढळून आल्याचे डॉ.अशरफी यांनी सांगितले. गॅस व पेट्रोलवर चालणारी ही कार आहे. दरम्यान, दोन्ही घटनांबाबत रामानंद नगर व शहर पोलिसांना माहिती देण्यात आली.