जळगाव : एक किलो वजनाचे नकली सोन्याचे मनी व माळा देऊन निखिल कचरुलाल जोशी (रा.जयकिसनवाडी) यांची दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोपाल नावाच्या तरुणासह त्याच्यासोबत असलेल्या अज्ञात व्यक्तीविरुध्द सोमवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जोशी यांचे सुभाष चौकात स्टॅँडर्ड मद्रास रेस्टॉरंट अॅण्ड कोल्ड्रींक्स नावाचे हॉटेल आहे. त्यांच्याकडे गेल्या तीन ते चार दिवसापासून दोन तरुण येत होते. आम्ही जीर्ण इमारत तोडण्याचे काम करतो. हे काम करीत असताना आम्हाला सोन्याचे मनी सापडले आहेत. तुम्हाला कमी किमतीत हे मनी देतो असे सांगून तीन दिवस जोशी यांच्यामागे तगादा लावला. मोहाला बळी पडून जोशी यांनी रविवारी दोन लाख रुपयात मनी खरेदी केले. त्यातील एक मनी सराफाकडून तपासून पाहिला असता तो खरा होता. ते दोघं जण रोकड घेऊन गेल्यानंतर जोशी यांनी अन्य मनी व माळ तपासली असता ती बनावट निघाली. फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रविवारी जोशी यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार अर्ज दिला. त्यानंतर सोमवारी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या दोन्ही तरुणांनी सराफ बाजारात आणखी काही दुकानात जावून मनी दाखविल्याची माहिती मिळाली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष रोही करीत आहेत.
जळगावात नकली सोने प्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:33 PM