विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: मुख्य बाजारपेठ असलेल्या दाणाबाजारातील सुकामेव्याच्या दुकानावरील छताचा पत्रा काढून चोरट्याने गल्ल्यातून साडेचार लाख रुपयांची रोकड लंपास केली. त्यानंतर शेजारील दुकानातदेखील चोरी केल्यानंतर चोरटा पसार झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, चोरी करण्यापूर्वी चोरट्याने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर कापून टाकल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
शहरातील गायत्रीनगरातील दिलीप शोभराजमल वाधवाणी यांचे दाणाबाजारात सच्चा सौदा नावाने सुकामेव्याचे दुकान आहे. शनिवारी व्यापारी येणार असल्याने वाधवाणी यांनी त्याला देण्यासाठी रोकड आणली होती. मात्र, व्यापारी न आल्यामुळे त्यांनी पैसे तेथेच ठेवून ते रात्री दुकान बंद करून घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने त्यांचे दुकान बंदच होते. दिलीप वाधवाणी यांचा मुलगा हर्ष हा सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी दुकानावर आला. दुकान उघडल्यानंतर त्याला दुकानातील पीओपी तुटलेले दिसले तसेच गल्ल्यातील साडेचार लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे लक्षात आले.
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुकानाची पाहणी केल्यानंतर दुकानाच्या छतावर असलेला पत्रा कापलेला दिसून आला. त्यामुळे चोरटा हा दुकानाच्या मागील बाजूने पत्र्यावर चढून आत शिरल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. वाधवानी यांच्या दुकानाशेजारीच ओमप्रकाश चावला यांचे भगवती ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. चोरट्याने त्यांच्या दुकानातदेखील चोरी केली असून त्याने तेथून एक हजार ७०० रुपयांची रोकड आणि चांदीचा शिक्का चोरून नेल्याची माहिती चावला यांनी दिली.