जळगाव : शहरात रविवारी सकाळी तीन धक्कादायक घटना घडल्या. भल्या पहाटे साडेतीन वाजता खेडी येथे पडलेल्या दरोड्यात पोलीस अंमलदाराच्या आई, वडिलांना बॅटने मारहाण करून पोलीस कर्मचाऱ्याच्या साखरपुड्याची रोकड तर राधाकृष्ण नगरात नवरीचा बस्ता लांबविण्यासह दुसऱ्या एका घरात रोकड हाती न लागल्याने धान्य काढून घरात रांगोळी काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नंदुरबार पोलीस दलात योगेश भोळे कार्यरत आहे. त्यांच्या खेडी येथील घरी दरोडेखोरांनी मध्यरात्री प्रवेश करुन योगेश भोळे यांच्या आई वडीलांना बेदम मारहाण करत ५० हजाराची रोकड लांबविली. ५० हजाराची रोकड ही योगेश भोळे यांच्या सारखपुड्यासाठीची होती. तर दुसरीकडे राधाकृृृृृष्ण नगर येथे जितेंद्र मधुकर सैतवाल (४७) यांचे बंद घर चोरट्यांनी लक्ष केले. सैतवाल यांची मुलगी साक्षी हिचे ७ मार्च रोजी लग्न आहे. तिच्या लग्नासाठीचा घरात असलेला ३७ हजार रुपये किंमतीचा घाघरा, साड्या, दागिने अशा अख्खा बस्त्यासह एकूण दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवून नेला. सैतवाल यांच्या शेजारीच प्रशांत सपकाळे यांचे घर आहे. त्यांचे बंद घर सुध्दा चोरट्यांनी लक्ष केले. मात्र याठिकाणी काही ऐवज हाती न लागल्याने चोरट्यांनी घरातील धान्याची रांगोळी काढून पोबारा केला. सकाळी सैतवाल यांच्या घरी चोरीच्या प्रकारानंतर सपकाळे यांच्या घरी चोरट्यांनी धान्याची रांगोळी काढल्याचे समोर आले. सपकाळे यांच्याकडे यापूर्वी लाॅकडाऊनच्या काळात घरफोडी झाली होती.