ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 29 - जिल्हाधिका:यांनी भेट दिल्यानंतरही मनपाच्या घरकुलांमध्ये सुरु असलेल्या सट्टा अड्डयावर शनिवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून 27 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या धाडसत्राने अनेक जण पसार होण्यात यशस्वी झाले. गेल्या आठवडय़ात जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त किशोर राजे निंबाळकर व महापौर ललित कोल्हे यांनी मेहरुणमधील घरकुलांमध्ये भेट दिली असता तेथे सट्टा, जुगार यासारखे अवैध धंदे चालत असल्याचे निदर्शनास आले होते. हा प्रकार पाहून जिल्हाधिका:यांनी पोलीस प्रशासनाला कारवाईबाबत पत्र दिले होते, मात्र तरीही पोलिसांनी या ठिकाणी कोणतीच कारवाई केलेली नसल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या पाहणीत आढळून आले होते. त्यामुळे ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर मनपा स्थायी समितीच्या सभेत हा मुद्या गाजला होता. या पाश्र्वभूमीवर शनिवारी सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, भरत लिंगायत, अशपाक शेख, दीपक चौधरी, नामदेव पाटील, शिवदास चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. रामलाल कडू शिंदे (रा.तोंडापूर, ता.जामनेर), नामदेव नारायण पाटील, गोविंदा बळीराम टोंगळे, संजय श्रावण सोनार व बाळगीर द्रौणगीर गोसावी (सर्व रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सट्टा जुगाराचे साहित्या व 27 हजार 10 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.