लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोकणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काजूच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याची आवक घटली आहे. त्यामुळे काजूचे भाव वाढून ९३० ते ९८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. एकीकडे काजूचे भाव वाढत असताना विदेशातून आयात होणाऱ्या बदामाच्याही भावात वाढ होऊन ते एक हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.
काजू-बदामाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर असले तरी कोरोनाकाळात सुकामेवा सेवनाकडे कल वाढल्याने मध्यम वर्गीयांकडूनदेखील काजू-बदामाची मागणी वाढली. त्यामुळे त्यांचे भाव काही प्रमाणात वाढले.
काजूच्या माहेरघरात मोठे नुकसान
जळगावात काजूची प्रमुख आवक ही कोकणासह ओडिशामधूनही होत असते. त्यात कोकणातील काजूला अधिक पसंती दिली जाते. मात्र, काजूचे मोठे उत्पादन असलेल्या कोकणातच गेल्या महिन्यात अतिवृष्टी होऊन प्रचंड नुकसान झाले. यात काजूच्याही उत्पादनावर परिणाम झाल्याचे सांगितले जात असून यामुळे थेट आवकवरच परिणाम होऊन ती २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. जळगावात दररोज तीन टन काजूची आवक होते. त्यात ७५ ते ८० क्विंटलने घट झाली आहे.
२०० रुपये प्रति किलोने वाढ
दोन ते तीन आठवड्यांपूर्वी काजूचे भाव ७६० ते ७८० रुपये प्रति किलो होते. मात्र आवक कमी झाल्याने काजूचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. त्यात अगोदर ते ८८० ते ९३० रुपयांवर पोहोचले व आता पुन्हा आणखी वाढ होऊन ९३० ते ९८० (दर्जानुसार) रुपये प्रति किलोवर काजू पोहोचले आहेत. नुकसानीमुळे थेट २०० रुपयांनी काजूच्या भावात वाढ झाली आहे.
बदामांचीही आवक घटली
काजूसोबतच बदामाच्याही भावात वाढ होऊन ते थेट एक हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. ऑस्ट्रेलिया, कॅलिफोर्निया येथून बदामाची आवक होत असते. मात्र, ऑस्ट्रेलियात पीक कमी आल्याने बदामाची आवक कमी झाली, तर कॅलिफोर्नियातील आयातच थांबली आहे. या देशातून आयात सुरू होण्यास साधारण दीड महिना लागणार असल्याने तोपर्यंत बदामाचे भाव चढेच राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तीन आठवड्यांपूर्वी ६०० रुपये प्रति किलो असलेल्या बदामाच्या भावात जवळपास ४०० रुपयांची वाढ होऊन ते सध्या एक हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे काजूची आवक कमी झाल्याने त्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तसेच विदेशातून आयात होणारी बदामाची आवकही कमी झाल्याने त्याचेही भाव वाढले आहेत. साधारण दीड ते दोन महिने हे भाव असेच राहू शकतात.
- सुरेश बरडिया, सुकामेवा विक्रेते.