विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: कट मारून पळ काढणाऱ्या भरधाव टँकरने सुकलाल पंडित सोनवणे (५५, रा. विटनेर, ता. जळगाव) या पशूपालकाला जोरदार धडक दिली. यात ते जागीच ठार झाले असून एक म्हैस दगावली असून एक म्हैस जखमी झाली आहे. ही घटना नेरी- म्हसावद रस्त्यावर विटनेर येथे दुपारी साडेचार वाजता घडली. घटना घडल्यानंतर गावातील नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याने रात्रीपर्यंत वाहतूक अडवून ठेवली. एमआयडीसी पोलिस तेथे पोहचले मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
तालुक्यातील नेरी-म्हसावद रस्त्यावरील विटनेर गावातील सुकलाल सोनवणे यांच्याकडे पाच म्हशी असून त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे. मंगळवार, १९ रोजी ते म्हशी चारण्यासाठी गेले होते. तेथून दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास म्हशी घेऊन घरी येत असताना रसायन घेऊन जाणाऱ्या भरधाव टॅँकरने (जी.जे.१२, बी.व्ही.७४७५) म्हशीसह पशुपालकाना जोरदार धडक दिली. त्यात सोनवणे हे जागीच ठार झाले. तसेच एक म्हैसही दगावली तर एक म्हैस गंभीर जखमी. घटनेची माहिती गावासह परिसरात वाऱ्यासारखी पसरली व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर ठिय्या दिली. त्यामुळे वाहतुक पूर्णतः ठप्प झाली होती.
या रस्त्यावर नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असल्याने नागरिक आक्रमक झाले आहे. अपघातानंतर वाहने निघून जातात मयताचे कुटुंब उघड्यावर येते व त्यांना कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे या पशुपालकाला आताच मदत मिळाली पाहिजे, यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिकादेखील घेतल्याने मृतदेह रस्त्यावरुन उचलला नाही. त्यामुळे दुपारी साडेचार वाजेपासून वाहतूक ठप्प झाली व वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पळासखेडा येथे मारला होता कट
नेरीकडून येणाऱ्या या टँकरने पळासखेडा येथे एका वाहनाला कट मारला होता व तो तेथे न थांबता निघून गेला. त्यामुळे तेथील काही मंडळी वाहने घेऊन टँकरचा पाठलाग करीत होते. त्यामुळे हे टँकर चालक भरधाव वेगाने निघाला होता. त्यात विटनेर येथे पुलाजवळच या टँकरने पशुपालकाला व म्हशींना उडविले. दुपारपासून वाहतूक खोळंबल्याने वाहने थांबून होती. शिवाय दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची यात भर पडत होती. त्यामुळे दुचाकी व अन्य छोट्या चारचाकी वाहने वराडमार्गे निघत होती. मात्र मोठ्या वाहनांना जागेवरून हालता येत नव्हते. घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधीकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले व त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ मदत मिळण्याच्या मागणीवर ठाम होते व कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी करीत होते.