लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : निमखेडी गावाजवळील एका स्मशानभूमीनजीक धारधार चॉपर घेऊन फिरणाऱ्या अक्षय अनिल महाले (२१, रा. निमखेडी) या तरूणाला बुधवारी सायंकाळी तालुका पोलिसांनी पकडले. पोलिसांनी त्याच्याकडील चॉपर जप्त केला असून, याप्रकरणी त्याच्यासह आणखी एकाविरूद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निमखेडी गावाजवळील एका स्मशानभूमीनजीक एक तरूण धारदार चॉपर सोबत घेऊन फिरत असल्याची माहिती बुधवारी तालुका पोलिसांना मिळाली होती. सायंकाळी ६ च्या सुमारास पोलिसांनी निमखेडी येथे येत संबंधित तरूणाला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ पोलिसांना चॉपर सापडला. त्याची चौकशी केली असता, त्याने आपले नाव अक्षय महाले असल्याचे सांगितले. तसेच मयूर मधुकर अढाळके याच्याकडून हा चॉपर घेतल्याची माहिती त्याने दिली. याप्रकरणी सुशील पाटील यांच्या फिर्यादीवरून अक्षय महाले व मयूर अढाळके यांच्याविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अशोक दुसाने करत आहेत.