लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काही कामानिमित्त दुकानमालक बाहेर गेले असल्याची संधी साधत दुकानातचं चोरी करणा-या नोकरांना मंगळवारी दुपारी २ वाजता दुकान मालकानेच रंगेहाथ पकडल्याची घटना बळीराम पेठेतील सतनाम हॅण्डलूम येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सिंधीकॉलनी परिसरातील कंवरनगरातील रहिवासी मुकेश अर्जुनदास बाधवाणी (४३) यांचे बळीरामपेठेत सतनाम हॅण्डलूम नावाचे दुकान आहे. या दुकानावर किरण दत्तू नन्नवरे व पंकज राजू माळी हे दोघं गेल्या तीन वर्षांपासून कामाला आहे. मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे बाधवाणी यांनी दुकान उघडले. त्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या दुकानासमोरील एका दुकानात ते भेटण्यासाठी गेले. त्यांना भेटून ते १० मिनिटात परत आले असता, त्यांना दुकानाच्या बाहेर पंकज कोळी हा मोटारसायकलवर बसून होता व त्याच्या मागे एक अनोळखी मुलगा बसलेला होता. त्यांच्याकडे दुकानातील लेडीज गारमेंटची गोणी होती. दोघांनी बाधवाणी यांना बघताच तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
आरोळी मारताच दोघांना पकडले
पंकज व त्याच्या साथीदार दुचाकीवर पळून जात असताना बाधवाणी यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी आजूबाजूचे दुकानदार मुकेश समदाणी, अमर कुकरेजा, मयुर बाधवाणी, दिलीप कटारीया यांनी धाव घेवून त्या दोघांना पकडून ठेवले.
यापूर्वीही केली होती दुकानात चोरी
पंकज कोळी याने गेल्या काही दिवसांपूर्वी दुकानात चोरी केली होती. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला होता. परंतु बाधवानी यांनी त्यावेळी तक्रार दाखल केली नव्हती. परंतु मंगळवारी पुन्हा पंकज कोळी व किरण दत्तू नन्नवरे यांनी दुकानातील स्कार्फ गोणीत भरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले. त्यांनी दुकानातील सुमारे १५ हजार रुपये किंमतीचा माल चोरी करुन घेवून जात असतांना रंगेहाथ पकडले. दरम्यान, किरण दत्तू नन्नवरे, पंकज राजू कोळी (दोघ रा. जैनाबाद) व राकेश प्रताप सपकाळे (रा. दिनकर नगर) यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.