जळगाव - कत्तलीसाठी अवैधरित्या बैलांची वाहतूक करणारे आयशर ट्रक शनिवारी नागरिकांसह एमआयडीसी पोलिसांनी उमाळा फाट्याजवळ पकडले. त्यात सुमारे १ लाख ३० हजार रूपये किमतीचे ११ बैल निर्दयीपणे कोंबून भरलेले पोलिसांना आढळून आले असून त्यांची सुटका करण्यात यश आले आहे. दरम्यान, याबाबत एमआयडीसी पोलिसात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. तर नशिराबाद येथेही आधी या आयशर चालकाला संशयावरून अडवून मारहाण करण्यात आली असल्याचे उघड झाले आहे.उमाळा फाट्याजवळून एमएच ४६-एएफ ५५५४ क्रमांकाच्या आयशर ट्रकमधून बैलांची वाहतूक केली जात असल्याची माहिती काही नागरिकांना मिळाली होती. नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने शनिवारी सकाळी १०.३० वाजता उमाळा फाट्याजवळ ट्रक पकडला. झाडाझडती केल्यानंतर ट्रकमध्ये ११ बैल निर्दयीपणे कोंबून भरलेले आढळून आले. ट्रक चालकाची चौकशी केली असता, अवैधरित्या विनापरवानगी तो गुरांची वाहतूक करीत असल्याचे चौकशीअंती समोर आले. त्यामुळे त्याच्याविरूध्द समाधान गुलाब पाटील यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम २०१५ चे कलम ५ (अ) ५ (ब) प्राणी छळ प्रतिबंध कायदा ११ ड, महाराष्ट्र प्राणी सरंक्षण कायदा १९७६ चे कलम ६, ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नशिराबाद येथेही मारहाणदरम्यान याच आयशर चालकाला बैलांची वाहतूक करीत असल्याच्या कारणावरून दोन तरुणांनी नशिराबाद शिवारात शनिवारी सकाळी ८ वाजता मारहाण केल्याचेही उघडकीस आले आहे. याप्रकरणी मारहाण करणारे विनोद भोई व राम करोसिया (रा.नशिराबाद) यांच्याविरुध्द आयशर चालकाच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.