जळगाव : कलियुगात सर्वसाधारणतः मनुष्याच्या जीवनात सुख सरासरी २५ टक्के आणि दुःख ७५ टक्के असते. मनुष्याची धडपड जास्तीत जास्त सुख कसे मिळेल, यासाठी असते. याकरिता प्रत्येक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे विषयसुख उपभोगण्याचा प्रयत्न करतो; परंतु विषयसुख हे तात्कालिक आणि निकृष्ट प्रतीचे असते, तर आत्मसुख, अर्थात आनंद हा चिरंतन अन् सर्वोच्च प्रतीचा असतो. ते आत्मसुख प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे ‘अध्यात्म’.
अध्यात्माचे इतके महत्त्व असताना खेदाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च आनंद आणि सर्वज्ञता देणाऱ्या विषयाकडे फारच थोडे जण वळतात. विषयसुखाच्या अनंतपटीने आनंद असतो, हे कळले तर विषयसुखापेक्षा आनंदाच्या प्राप्तीसाठी कोणीही प्रयत्न करील. अध्यात्माचे मानवी जीवनातील महत्त्व कळण्यासाठी सर्वप्रथम मानवाचे ध्येय, तसेच मानवी जीवनासंबंधी अन्य काही गोष्टी याविषयी थोडे जाणून घेऊ.
मानवाचे ध्येय चिरंतन आणि सर्वोच्च आनंदाची प्राप्ती. किडामुंगीपासून प्रगत मानवप्राण्यापर्यंत प्रत्येक प्राणी, सर्वोच्च सुख सातत्याने कसे मिळेल, यासाठीच धडपडत असतो; पण सुख कसे मिळवायचे, हे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकवले जात नाही. सर्वोच्च आणि सातत्याने टिकणाऱ्या सुखास ‘आनंद’ असे म्हणतात. हा आनंद मिळवून देणारे शास्त्र म्हणजे ‘अध्यात्मशास्त्र’.
पाश्चात्त्य विज्ञान जीवन अधिकाधिक सुखी करत आहे. पण त्यामुळे मानव ईश्वरापासून, म्हणजे सच्चिदानंदापासून दूर दूर जात आहे. सुख-दुःखाची कारणे शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक असतात. अशा प्रकारच्या दुःखाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. रोगग्रस्त असताना शरीराला दुःख जाणवणे हे शारीरिक उदाहरण होय. कोणीतरी फसवल्यास मनाला दुःख होणे हे मानसिक उदाहरण होय. अनेकदा प्रयत्न करूनही परीक्षेत उत्तीर्ण न होणे, लग्न न जमणे इत्यादींमुळे दुःख होणे हे आध्यात्मिक उदाहरण होय.
- सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था, जळगाव