जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यू नामा, बोदवड, पाचोरा तालुक्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एप्रिल महिन्यातील पहिल्या सात दिवसांतच कोरोनाने जिल्ह्यात तब्बल १०१ बळी घेतले आहेत. दररोज होणाऱ्या मृत्यूंमध्ये युवकांचाही समावेश असल्याने सर्वजचण धास्तावले आहे. १ एप्रिल रोजी १३ बळी होते. त्यानंतर कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी झालेलीच नाही. बुधवारी देखील १४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे तर त्यात रावेर तालुक्यात ३३ आणि ३८ वर्षांच्या पुरुषांचा समावेश आहे. त्यासोबतच कोरोनाने घेतलेल्या एकूण बळींचा आकडा १७२६ एवढा आहे.
जळगाव जिल्ह्यात बुधवारी ११४१ नवे रुग्ण आढळून आले आहे. गेल्या महिनाभरापासून हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव शहर आणि चोपडा तालुक्यातील रुग्णांची संख्या बुधवारी काहीशी कमी झाली आहे ही बाब दिलासादायक असली तरी त्यासोबतच पाचोरा आणि बोदवड तालुक्यात मात्र कोरोनाने कहर केला आहे. पाचोरा तालुक्यात एकाच दिवसात १२१ आणि बोदवडमध्ये १०३ रुग्ण आढळून आले आहेत तर रावेरमध्येदेखील ८८ रुग्ण आढळून आले.
चोपडा तालुक्यात बुधवारी ७९ रुग्ण आढळून आले. जळगाव शहरात १६८ रुग्ण आढळून आले आहेत.
मृतांमध्ये जळगावच्या चौघांचा समावेश
जळगाव शहरातील ६०, ७५ वर्षांच्या पुरुषांचा तर ६५ आणि ७९ वर्षांच्या महिलांचा मृतांमध्ये समावेश आहे. अळमनेर तालुक्यात दोन, मुक्ताईनगर,रावेर तालुक्यात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे तर चोपडा, धरणगाव, यावल आणि चाळीसवमध्ये मध्ये एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. रावेर तालुक्यातील दोन्ही मृतांचे वय हे कमी आहे. त्यातील एकजण ३३ तर दुसरा ३८ वर्षांचा तरुण आहे. तरुणांचा कोरोनाने बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण जळगाव शहरात
जळगाव शहरात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण २३७४ आहेत. त्यापाठोपाठ चोपडा तालुक्यात २३४६ रुग्ण उपचार घेत आहे. भुसावळमध्ये ९९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर इतर सर्व तालुक्यांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही पाचशेच्या आत आहे.
बाधित मृत्यू
१ एप्रिल ११६७ १३
२ एप्रिल ११४२ १५
३ एप्रिल ११९४ १५
४ एप्रिल ११७९ १४
५ एप्रिल ११८२ १५
६ एप्रिल ११७६ १५
७ एप्रिल ११४१ १४