रिॲलिटी चेक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी बाजारपेठेत मात्र, अजुनही विनामास्क किंवा मास्क खाली गळ्यावर उतरवून फिरणाऱ्यांची संख्या आहे तीच आहे, त्यामुळेही प्रचंड गर्दीची ठिकाणे कोरोचा विस्फोट करण्यास कारणीभूत ठरण्याची दाट शक्यता आहे. अशातच लक्षणे नसलेले फिरणारे लोक अशा ठिकाणी अत्यंत धोकादायक मानले जात आहे. गुरूवारी बाजारपेठेत ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत हे गंभीर वास्तव समोर आले.
जिल्ह्यात अगदीच झपाट्याने कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यातच जळगाव शहर हे सर्वात मोठे हॉटस्पॉट म्हणून समोर आले आहे. गेल्या चार दिवसांपासून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा दंडूका उगारला जात आहे. मात्र, तरीही नागरिकांची बेफिकीरी वाढतच असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे.
हे अतिशय गंभीर
- अनेक भाजी, फळ विक्रेते नाका तोंडाला बांधलेला रूमाल ग्राहकांशी बोलण्यासाठी गळ्यावर उतरवून ठेवतात.
- गुरूवारी बाजारात अनेक लहान मुले होती. गंभीर बाब म्हणजे त्यांनी मास्क अर्धवट लावलेले होते. पालकांचेही याकडे दुर्लक्ष होत.
- मास्क वापरणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र असले तरी गर्दीत तीन ते चार लोक विनामास्क वावरतच आहेत.
-विना मास्क वावरणाऱ्यांपासूनच सर्वाधिक धोका आहे. विशेष म्हणजे बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन अशक्य आहे.
गाफील राहू नका
सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, चव न लागणे ही लक्षणे असली तरच कोरोना हा गैरसमज मनातून काढून टाका, ज्यांची प्रतिकारक्षमता अधिक असते, यातील काहींना कोरोनाची लागण होऊनही कुठलीच लक्षणे दिसत नाहीत. अशी लोक बाजारात बिनधास्त वावरतात आणि हेच कोरोनाबॉम्ब ठरू शकतात. तेव्हा प्रत्येकाने मास्क वापरणे व सोशल डिस्टन्स पाळणे महत्त्वाचे असल्याचे तज्ञ सांगतात.
फुले मार्केट जागा कमी गर्दी अधिक
फुले मार्केटमध्ये कपडे, विविध वस्तूंची दुकाने अगदी जवळजवळ आहेत. या पूर्ण पट्ट्यात जागा कमी मात्र, या मार्केटमध्ये येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी पाहणी केल्यानंतर बहुतांश लोकांनी मास्क परिधान केले होते. अनेकांनी मास्क अर्धवट लावलेले होते. मास्क न घातलेल्यांची संख्या या ठिकाणी अगदीच कमी होती.