लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा प्रशासनाने अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन त्या तत्काळ रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी शिधापत्रिका धारकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यात उत्पन्न मर्यादा देखील तपासली जाणार आहे.
जिल्ह्यात सध्या अंत्योदय योजनेत १ लाख ३७ हजार ७४९ रेशन कार्ड आहेत. ही मोहीम १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधीत राबवली जाणार आहे. त्यासाठी शहरातील शिधापत्रिकाधारकांकडून माहिती घेतली जाणार आहे. त्याची तपासणी केली जाईल. दुकानातून शासकीय कर्मचारी किंवा तलाठी मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत नमुना अर्ज वाटप केले जाणार आहेत. हे अर्ज राज्य शासनाकडून पुरवले जाणार आहेत. ते भरून त्याची माहिती आवश्यक ती जुुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व अर्ज संबंधित शासकीय कर्मचारी व तलाठी यांना ही माहिती क्षेत्रीय कार्यालयाला द्यावी लागेल.
आलेल्या माहितीनुसार दोन याद्या कराव्या लागणार आहेत. त्यात गट अ म्हणून केलेल्या यादीत पुरेसे पुरावे जोडलेले शिधाकार्डधारक असतील. त्यांचा पुरवठा कायम राहील तर पुरेसे पुरावे न देणाऱ्यांना गट ब यादीत घेतले जाईल. त्यांचा पुरवठा तत्काळ थांबवला जाणार आहे. कागदपत्रे जमा करण्यासाठी त्यांना मुदत दिली जाणार आहे.
काय लागतील कागदपत्रे
निवासासंबंधीचा पुरावा, भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, एलपीडी जोडणी क्रमांक, विजेचे देयक, टेलिफोन देयक, बँक पासबुक, वाहन परवाना, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, यासोबतच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस जोडणीची माहिती. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्नाची माहिती.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेत यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. त्यात पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
का रद्द होईल कार्ड
निवासाच्या पुराव्यासाठीची योग्य माहिती न दिल्यास, उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेली असल्यास रेशनकार्ड रद्द होऊ शकते. रेशन कार्ड रद्द होण्याच्या आधी पुरेसे पुरावे सादर करण्यात मुदत मिळणार आहे. त्या काळात शिधावस्तूंचा पुरवठा मात्र थांबवला जाईल.
कोट - शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात या मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. ही मोहीम १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या काळात होईल. त्यासाठीची योग्य ती कार्यवाही देखील सुरू आहे. - सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी
रेशन कार्ड आकडेवारी
अंत्योदय १ लाख ३७ हजार ७४९
एपीएल रेशन कार्ड ३ लाख २३ हजार ११
पीएचएच रेशन कार्ड ४ लाख ७० हजार ९५०
पांढरे रेशन कार्ड ७४ हजार ९०३