‘अमृत’च्या प्रश्नावर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार बैठक
जळगाव - शहरात अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामातील अडचणी समजून घेण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार आहे. जळगाव फर्स्टचे संचालक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. या भेटीत वाॅटरमीटर व इतर बाबींवर चर्चा करण्यात आली, तसेच मजिप्रा, मक्तेदार व मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन या विषयावर तोडगा काढण्यात येणार आहे.
डीमार्ट ते इच्छादेवी मुख्य रस्त्यावर भुयारी गटारचे काम सुरू करा!
जळगाव - शहरातील इच्छादेवी चौक ते डीमार्ट दरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याठिकाणी भुयारी गटार योजनेचे काम शिल्लक असल्याने रस्त्याची दुरुस्ती करता येत नाही. यामुळे उपमहापौर सुनील खडके यांनी या रस्त्यालगत भुयारी गटार योजनेचे काम त्वरित करण्याचा सूचना मनपा अ्रधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याबाबत मक्तेदाराशी देखील उपमहापौर चर्चा करणार आहेत. या ठिकाणच्या रस्त्याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत.
आमदारांवर टीका करणाऱ्यांनी स्वत:चे मानसिक संतुलन तपासावे
जळगाव - ज्या आमदारांनी सागर पार्कसाठी निधी आणला, तेच काम थांबविण्यासाठी आमदार प्रयत्न करत असल्याचा आरोप चुकीचा असून, आमदारांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांनी आपले मानसिक संतुलन आधी तपासावे. चमकाेगिरी करून मते मिळत नसल्याचा सल्ला देत भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे यांनी शिवसेनेची सरकार दरबारी पत असेल तर १०० काेटींच्या निधीवरील स्थगिती उठवून आणावी, असे आव्हान शिवसेनेच्या नगरसेवकांना दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील सत्ताधारी भाजप व विराेधक शिवसेनेत सागर पार्कच्या मुद्द्यावरून शाब्दीक युद्ध पेटले आहे.. शिवसेनेकडून आमदारांची ‘नार्कोटेस्ट’ करण्याची मागणी केल्यानंतर आता भाजपनेदेखील पत्रक काढून सेना नगरसेवकांना उत्तर दिले आहे..