प्रभाव लोकमतचा
दापोरा, ता. जळगाव : वाळूचा ठेक्याचा लिलाव झालेला नसताना भरदिवसा मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच ग्रामदक्षता समितीची बैठक घेण्यात आली. गावातील नदीपात्राकडून येणाऱ्या मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला.
दापोरा येथे कोणताही वाळूचा ठेक्याचा लिलाव झालेला नसताना भरदिवसा मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरू आहे. नदीपात्रात जेमतेम वाळूचा साठा शिल्लक असल्याने कारवाईची मागणी होत आहे. या संदर्भात ‘दापोरा येथे अवैध वाळू उपसा थांबेना’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने दि. २१ ऑगस्ट रोजी वृत प्रकाशित केले होते. त्यानंतर तहसीलदारांनी ग्रामदक्षता समितीला अवैध वाळूचा उपसा थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
ग्रामदक्षता समितीची पहिली बैठक
तहसीलदारांच्या पत्रानंतर दापोरा ग्रामपंचायत कार्यालयात २५ रोजी सरपंच कविता वाणी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. गावातील नदीपात्राकडून येणाऱ्या मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. तसेच महसूल विभागाच्या भरारी पथकाने दापोरा येथेही नियमित यावे, अशी मागणी करण्यात आली.
‘लोकमत’चे वृतानंतर काही प्रमाणात वाळूचा उपसा थांबला तसेच ग्रामदक्षता समितीचीदेखील पहिली बैठक झाली. यामुळे लोकमतचेदेखील आभार व्यक्त करण्यात आले. महसूलने कारवाईत सातत्य ठेवावे, अशी मागणी होत आहे. बैठकीस तलाठी सारिका दुरगुडे, ग्रामसेवक दिलीप पवार, पोलीस पाटील जितेश गवंदे उपस्थित होते.