खाद्यपदार्थ विक्रेत्यांना बजावले समन्स
जळगाव : रेल्वे गाडीमध्ये रेल्वे प्रशासनाची कुठलीही परवानगी नसतांना, अनाधिकृतपणे खाद्य विक्री करणाऱ्यांविरोधात रेल्वे प्रशासनाने कारवाई मोहिम हाती घेतली आहे. गेल्या आठवड्यात भुसावळ रेल्वे स्टेशनवर कारवाई केल्यानंतर, रेल्वे पोलिसांनी गाडीतही अशा प्रकारे खाद्य पदार्थ विक्रेत्यांना ताब्यात घेऊन, त्यांना अनाधिकृत व्यवसाय करण्याबाबत समन्स बजावले आहेत. अन्यथा यापुढे कठोर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
मासिक पास देण्याची मागणी
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे कोरोना काळातही गेल्या वर्षापासून ज्या विशेष गाड्या सुरू आहेत. त्यांना अद्यापही मासिक पासची सुविधा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाचोरा, चाळीसगाव या भागातून जळगावला येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने मासिक पासची सुविधा सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.
गटार तुडुंब भरल्याने सांडपाणी रस्त्यावर
जळगाव : रेल्वे स्टेशनजवळील माल धक्क्यासमोरील गटारीची सफाई न करण्यात आल्यामुळे, ही गटार कचऱ्याने तुडूंब भरून रस्त्यावरून पाणी वाहत आहे. यामुळे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने येथील गटारींची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.
शिवतीर्थ मैदानावर पसरली अस्वच्छता
जळगाव : शहरातील शिवतीर्थ मैदानावर भाजीपाला व्यावसायिकांना जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, हे व्यावसायिक व्यावसायानंतर शिल्लक भाजीपाला या मैदानावरच इतरत्र फेकत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे फिरायला येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने तातडीने या ठिकाणी स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.