जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील एक गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील दुसरा गट अशी विभागणी झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपा आणि फुटीरवादी राष्ट्रवादी गटाविरुद्ध रणशिंग फुंकलं आहे. त्यासाठी, महाराष्ट्र दौरा सुरू असून बीडनंतर जळगावमध्ये आज शरद पवार यांची सभा पार पडली. आमदार एकनाथ खडसेंच्या जळगाव जिल्ह्यात ही सभा झाल्याने नाथाभाऊंनीही सत्ताधारी भाजप व अजित पवारांवर जोरदार टीका केली. यावेळी, एकनाथ खडसेंना फडणवीसांना चांगलंच लक्ष्य केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंनी भाजपच्या नेत्यांना थेट इशारा दिला होता. तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेल, असे खडसेंनी म्हटले होते. दरम्यान, खडसेंनी सीडी कधी लावली नाही. पण, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जुने व्हिडिओ दाखवत त्यांनी पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपण राजकारण सोडून देऊ, असे फडणवीस म्हणाले होते, असा एक व्हिडिओ दाखवला. तर, काहीही झालं तरी राष्ट्रवादीसोबत युती नाही, अजित पवार यांनी मोठा भ्रष्टाचार केलाय. धरणं केवळ कागदावरच दिसतात, प्रत्यक्षात नाही अशा त्यांच्या भाषणांची व्हिडिओ कॅसेट खडसेंनी जळगावमधील सभेत चालवली. तर, अजित पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
जालन्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा आंदोलकांवर मंत्रालयातून आलेल्या आदेशानुसार लाठीचार्ज झाल्याची शंका आहे, असा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यास सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलंय. त्यानंतर, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवारांना लक्ष्य करण्यात येत आहे. जयंत पाटील यांच्यानंतर आता एकनाथ खडसेंनीही अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. आज होम ग्राऊंड म्हणजेच जळगावमधील सभेत बोलताना अजित पवारांना लक्ष्य केलं. त्यावेळी, शऱद पवार हेही व्यासपीठावर होते.
हा केवढा अपमान
राज्यात तिघांचं सरकार आहे. एका मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री. दोन बायका फजिती ऐका, असे म्हणत एकनाथ खडसेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला. अजित दादांनी इकडे उपमुख्यमंत्री असताना तिकडे पद घेतलं. अजित दादा म्हणजे स्मार्ट माणूस, बोलणे तसे करणारा माणूस, काम करणारा माणूस. पण, पक्ष बदलवला, पक्ष बदलवल्यानंतर स्वाभीमानी अजित दादा तिथे निर्णय घ्यायला लागले. मग, साखर कारखान्यांवर याला पैसे देऊ, त्याला पैसे देऊ, निर्णय झाला, स्वाक्षरी झाली. मग, देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा निर्णय रद्द करुन टाकला. हा केवढा अपमान आहे.
तुमचा स्वाभीमान गेला कुठे - खडसे
अजित दादांना निर्णय घ्यायचे अधिकार नाहीत. अजित दादांनी निर्णय घेतला की त्याच्यावर कोंबडा आता फडणवीसांचा लागणार आहे. फडणवीसांची सही झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सही लागणार आहे. क्या हालत बना दी दादा तुमने, यहाँ तो शेर थे... तुम्हाला किंमत होती. आता, प्रत्येक फाईल जर तुम्हाला फडणवीसांकडे घेऊन जावी लागत असेल तर तुमचा स्वाभीमान गेला कुठे? असा सवाल एकनाथ खडसेंनी अजित पवारांना विचारला. जळगावमधील सभेत एकनाथ खडसेंच्या निशाण्यावर अजित पवारच दिसून आले.