जळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक विशेष मुहूर्त म्हणजे अक्षयतृतीया होय. या दिवशी केलेले काम आणि दान हे कायम म्हणजेच अक्षय राहते. हा सण जळगावात उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त घरोघरी पूर्वजांच्या आठवणीत त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून घागर भरणे, तर्पण करणे आदी विधी करण्यात आले. खान्देशात दिवाळीनंतर सासरी गेलेल्या मुलींना माहेरी येण्याचा हक्काचा सणही आखाजीच असतो, पण यंदा कडक निर्बंध असल्याने, या अक्षय तृतीयेला विवाहिता माहेरी येऊ शकल्या नसल्या, तरी हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
खान्देशात आखाजीच्या सणाला मोठे महत्त्व असते. त्यानिमित्त घागर भरली जाते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मातीच्या घागरी आणि त्यावर ठेवले जाणारे छोटे मडके, डांगर हे फळ यांना चांगलीच मागणी होती. शुक्रवारी सकाळी सात वाजेपासूनच बाजार फुलला होता.
केळीचे एक पान २० रुपयांना
पितरांना या दिवशी केळीच्या पानावर जेवण दिले जाते. त्यामुळे केळीच्या पानांचे भाव चांगलेच वाढले होते. शहरातील अनेक ठिकाणांवर केळीचे पान ५ रुपयांपासून विक्री केले जात होते. दहा वाजेनंतर गांधी मार्केट परिसरात तर केळीचे एक पान २० रुपयांना विकले गेले. त्याचप्रमाणे, पत्रावळीही १५ ते २० रुपयांना एक याप्रमाणे विकली गेली. अनेकांनी तर फक्त पितरांच्या ताटाखाली ठेवायला म्हणून मिळेल ते केळीचे पान नेले.
शेणाच्या गोवऱ्यांचीही चढ्या भावाने विक्री
श्राद्धासाठी शेणाच्या गोवऱ्यांचीही चढ्या भावाने विक्री होत होती. एका ठरावीक साच्यात बनवलेल्या शेणाच्या गोवऱ्या १० रुपये प्रति नग या दराने विकल्या जात होत्या. त्यातही मोठी गोवरी २० ते २५ रुपये प्रति नग या दराने विकली गेली.
आमरस पोळीची रेलचेल
खान्देशातील अनेक घरांमध्ये जोपर्यंत अक्षय तृतीया येत नाही, तोपर्यंत आंबे खाल्ले जात नाहीत. अक्षय तृतीयेच्या दिवशी मनसोक्त आंबे खाल्ले जातात. त्यामुळे बुधवारपासूनच अनेक जण आंबे खरेदी करताना दिसत होते. यंदा आंब्यांचे भाव चांगलेच गडगडले असल्याने, जळगावकरांनी आंब्यांची मनसोक्त खरेदी केली. घराघरांमध्ये यंदा आमरस, पुरण पोळी यांची रेलचेल होती.
झोके वर गेलेच नाहीत
‘अथानी कैरी तथानी कैरी’ हे खान्देशी लोक गीत म्हणत, दरवर्षी विवाहिता माहेरी येतात. माहेरी झाडाला बांधलेल्या झोक्यावर झुलतात. मात्र, यंदा कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे यंदा अनेक विवाहिता माहेरी आल्याच नाहीत. त्यामुळे हे झोकेही खेळले गेले नाहीत. जळगावकरांनी शक्य तेवढ्या साधेपणाने सण साजरा केला.
अक्षय तृतीयेला सालदाराची नव्याने नेमणूक केली जाते. यंदा मात्र अनेकांना सालदारच मिळाला नाही. जुने जळगाव, पिंप्राळा, मेहरुण या भागात काही जण अजूनही शेती करतात. त्यांना यंदा सालदार मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. साल वाढविण्याची बोली करूनही सालदार मिळत नाही. अशीच परिस्थिती जळगाव तालुक्यातील शिरसोली, ममुराबाद, नशिराबाद या गावांमध्ये आहे.
यंदा पत्त्यांचे डाव चुपचुपके
आखाजीच्या दिवशी खान्देशात दरवर्षी पत्त्यांचे जुगाराचे डाव मोठ्या प्रमाणावर रंगतात. नियमित कधी पत्ते न खेळणारेही त्या दिवशी पत्ते खेळतात. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे जुने जळगाव, मेहरुण, पिंप्राळा या भागात कुठेही पत्त्यांचे डाव फारसे रंगले नाहीत. ज्यांना खेळण्याची भारीच हौस त्यांनी शहराबाहेरचा रस्ता धरला.