रामनवमी : भाविकांनी घेतले बाहेरून दर्शन
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षांप्रमाणे यंदाही बुधवारी शहरातील विविध श्रीराम मंदिरांमध्ये साध्या पद्धतीने श्रीरामजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. शासनाच्या सूचनेनुसार फक्त पाच भाविकांच्या उपस्थितीत मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दरम्यान, दर्शनासाठी मंदिरे बंद असल्यामुळे भाविक मंदिराबाहेरून कळसाचे दर्शन घेतांना दिसून आले.
रामनवमीनिमित्त नवीन बसस्थानकासमोरील चिमुकले श्रीराम मंदिरात सकाळी पाच वाजता महाअभिषेक करण्यात आला. त्या नंतर सात वाजता श्रीरामाची महाआरती होऊन, सकाळी ११ वाजता हभप दादा महाराज जोशी यांचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी बारा वाजता पाळणा हलवून श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी हभप ऋषिकेश महाराज जोशी, द्वारकाधीश जोशी उपस्थित होते.
तसेच शहराचे आराध्य दैवत असलेल्या ग्रामदैवत श्रीराम मंदिरातही साध्या पद्धतीने श्रीराम जन्मसोहळा साजरा करण्यात आला. पहाटे चार वाजता महाअभिषेक, त्यानंतर काकडा आरती, अकरा वाजता हभप श्रीराम महाराज जोशी यांचे कीर्तन झाले. त्यानंतर सायंकाळी श्रीरामाची महाआरती व भजन झाले. यावेळी हभप मंगेश महाराज जोशी, हभप श्रीधर महाराज जोशी उपस्थित होते.
इन्फो :
दर्शनासाठी मंदिराबाहेर गर्दी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद असल्याने रथ चौकातील ग्राम दैवत श्रीराम मंदिरासमोर दुपारी बारा वाजता रामाचा जन्म झाल्यानंतर नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली दिसून आली. नागरिक बाहेरूनच मंदिराचे व कळसाचे दर्शन घेत होते. यावेळी नुकतीच श्रीरामाची आरती झाल्याने, काही भाविक बाहेर उभे राहून आरती घेण्याची वाट पाहतांना दिसून आले. याच प्रकारे नवीन बस स्थानकासमोरील चिमुकले राम मंदिरासमोरही भाविकांची दर्शनासाठी गर्दी झालेली दिसून आली.मात्र, दर्शनासाठी मंदिर बंद असल्याने, भाविक बाहेरूनच दर्शन घेतांना दिसून आले.