सावखेडा : रावेर तालुक्यातील खिरोदा येथील सेंट्रल बँकेचे एटीएम ब-याच महिन्यांपासून बंद असल्याने हजारो खातेदार एटीएम सेवेपासून वंचित आहेत. कित्येक महिन्यांपासून बंद असलेले एटीएम सुरू न झाल्याने खातेदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. किमान बँकेच्या वेळेत तरी एटीएम सुरू करावे, अशी खातेदारांकडून मागणी करण्यात येत आहे.खिरोदा येथील सेंट्रल बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना सात-आठ महिन्यांपूर्वी घडली होती. सावखेडा, खिरोदा, रोझोदा, कोचूर, कळमोदा, जानोरी, चिंचाटी, तिड्या मोहमांडली, अंधारमळी परिसरातील हजारो नागरिकांचे खाते या बँकेत आहे. लाखो रुपयांचा व्यवहार दररोज बँकेतून होत असतो. बँकेतील खातेदारांची संख्या पाहता बँकेची सध्याची जागादेखील अपूर्ण पडते. बँकेच्या एटीएमची चोरट्यांनी तोडफोड केल्यापासून हे एटीएम बंदच आहे. खातेदार एटीएमच्या सेवेपासून वंचित आहे. एटीएमबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे याविषयी चौकशी केली असता या ठिकाणचे एटीएम जमा करून संबंधित खासगी एजन्सीचे एटीएम रद्द करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. एट एमची सुविधा असूनदेखील त्याचा लाभ घेता येत नसल्याने खातेदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एटीएम बंद असल्याने बँकेतील कर्मचारी वर्गावरदेखील त्याचा खूप ताण पडतो. किमान बँकेच्या वेळेत तरी एटीएम सुरू करण्यात यावे, अशी खातेदारांकडून मागणी होत आहे.
मागील काही महिन्याअगोदर सेंट्रल बँक खिरोदा येथील एटीएम फोडण्यात आले होते. यापूर्वीही एक-दोन वेळा एटीएम फोडण्यात आले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील एटीएम जमा करून घेतले आहेत व या ठिकाणचे एटीएम रद्द करण्यात आले आहे. -हितेश बालतांडे, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खिरोदा
सेंट्रल बँक खिरोदा येथील एटीएम सात आठ महिन्यांपासून बंद असल्याने परिसरातील ग्राहकांचे पैसे काढण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. त्यांना वेळोवेळी पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. त्यात वयोवृद्ध तसेच शेतकरी, विद्यार्थी यांनाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. तरी वरिष्ठ पातळीवरून या प्रश्नाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर एटीएम सुरू करण्यात यावे. जनतेला न्याय द्यावा.-किरण पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघ, रावेर
सेंट्रल बँक ऑफ इंडिया खिरोदा एटीएमला सिक्युरिटी गार्ड द्यायला तयार नाही. आमच्या करारामध्ये सिक्युरिटी गार्डचे कोणतेही प्रयोजन नाही. आम्ही खिरोदा येथील सेंट्रल बँक एटीएम फुटले तेव्हा एटीएम जमा करून घेतले आहे व आम्हाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.-दीपक तिवारी, प्रायव्हेट एजन्सी चैनल मॅनेजर