गेल्या महिन्यात दिली होती भेट : पुढील महिन्यात येणार दुसरी समिती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव: स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी केंद्राच्या समितीने एप्रिल महिन्यात शहराच्या साफसफाईची पाहणी केली असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे केंद्राच्या समितीने शहरात अचानक भेट देऊन शहरातील विविध भागात जाऊन स्वच्छतेची व कचरामुक्त शहराबाबतची पाहणी केली असल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
दरवर्षी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा घेतली जात आहे. स्पर्धेद्वारे शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, हा हेतू असून, याच स्पर्धेच्या निकालावर मनपाला मिळणारा १५ व्या वित्त आयोगाचा निधीदेखील अवलंबून राहणार आहे. कचरामुक्त शहरासाठी एप्रिल महिन्यात केंद्राच्या समितीने पाहणी केली असून, समितीने वेगवेगळ्या प्रभागात जाऊन नागरिकांचे अभिप्राय घेतले आहेत, तसेच ओला व सुका कचरा वर्गीकरण, डोअर टू डोअर कचरा संकलन याबाबतची पाहणी केंद्राच्या समितीने केली आहे. याबाबत मनपा आरोग्य विभागालादेखील कोणत्याही सूचना केंद्रीय समितीने दिलेल्या नव्हत्या, चार जणांच्या समितीने ही पाहणी केली आहे.
घनकचरा प्रकल्पाचे काम झाले तर शहराच्या मानांकनात पडू शकते भर
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत २०१९ मध्ये जळगाव शहराचा क्रमांक ७६ वा होता. तर २०२० मध्ये जळगाव शहराचा क्रमांक ६४ पर्यंत वाढला होता. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून सातच्या सर्वेक्षण मानांकनात जळगाव शहरातील घनकचरा प्रकल्पाचे काम पूर्ण नसल्याने जळगाव महापालिकेला तब्बल ५०० गुणांवर पाणी फिरावे लागत आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास महापालिकेला पाचशे गुणांचा फायदा होऊन शहराच्या एकूण मानांकनातदेखील भर पडू शकते.
पुढील महिन्यात सुरू होणार प्रकल्पाचे काम
घनकचरा प्रकल्पाच्या सुधारित डीपीआरला राज्य शासनाने मंजुरी दिल्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. बायो मायनिंगचे कामदेखील ७० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया झाल्यानंतर घनकचरा प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, रोज पडणाऱ्या कचऱ्यावरदेखील आता बायो मायनिंग प्रक्रिया केली जाणार असून, लवकरच या प्रकल्पाला सुरुवात होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.