जळगाव : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय समिती २२ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत धुळे जिल्ह्यातील पाहणी आटोपून जळगाव जिल्ह्यात दाखल होणार असून २३ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत जिल्ह्यातून बाहेर पडणार आहे. या धावत्या दौऱ्यात ही समिती जिल्ह्यातील ६ तालुक्यातील तब्बल १८ गावांना नुकसानीची पाहणी करणार असल्याचे समजते.जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यभरातच चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडूनही मदत मिळण्याची मागणी होत आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून आता नुकसानीच्या पाहणीसाठी समिती पाठविण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दिना नाथ व जयपूर येथील कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ.सुभाष चंद्रा यांचा समावेश असलेली समिती नाशिक विभागातील नुकसानीची पाहणी करीत आहे. ही समिती २२ रोजी धुळे जिल्ह्यातील पाहणी करीत दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यात प्रवेश करेल. पारोळा तालुक्यात ३ गावांची पाहणी दुपारी ३.३० पर्यंत करीत एरंडोल तालुक्यातील ३ गावांची पाहणी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आटोपून सायंकाळी ६ वाजेपर्यंत जळगावात जैन हिल्स येथे मुक्कामी येणार आहे. २३ रोजी सकाळी ८.३० वाजताच ही समिती शिरसोलीमार्गे पाहणीसाठी रवाना होईल. जळगाव तालुक्यातील ३, पाचोरा तालुक्यातील ४, भडगाव तालुक्यातील २, चाळीसगाव तालुक्यातील ३ गावांमध्ये पिकांच्या नुकसानीची पाहणी करून औरंगाबादमार्गे नगरकडे रवाना होईल.
केंद्रीय समिती करणार १८ गावांना नुकसानीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:52 PM