भुसावळ जि.जळगाव : मध्य रेल्वेच्याभुसावळ विभागाने सन २०२२-२३ आर्थिक वर्षात तब्बल १५७०.४१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मागील आर्थिक वर्षात ही कमाई १२२०.६७ कोटी होती. या तुलनेत यंदाच्या कमाईत तब्बल २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग मालामाल झाला आहे. भुसावळ विभागात यंदा तब्बल ३ कोटी ४३ लाख प्रवाशांनी प्रवास केला. मागच्या वर्षी १ कोटी २९ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. यंदा गतवर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी १६५ टक्क्यांनी जास्त आहे.
तिकीट तपासणी मधून ७१ कोटी रुपये वसूल करण्यात आले. गेल्या वर्षी ही वसुली ६२.६१ कोटी होती. मागील वर्षापेक्षा ही वसुली १३ टक्के जास्त आहे. विनातिकीट प्रवाशांकडून ९.१४ लाख रुपये वसूल करण्यात आले. गेल्या वर्षी ही वसुली ८.६५ लाख रुपये होती. तिकीट तपासणीसाठी ७ वेळा मोठी मोहीम राबविण्यात आली. यात १.२० कोटींची वसुली करण्यात आली. विविध पथकांनी केलेल्या कारवाईत पाच दलालांना पकडण्यात आले. आरक्षित तिकिटांची विक्री केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.