जळगाव : अतिशय उपयुक्त माहिती असलेल्या जळगाव जनता सहकारी बँकेच्या सन २०२१ सालच्या दिनदर्शिकेचे बुधवारी (दि.३०) बँकेच्या मुख्य कार्यालयात जळगाव येथील ‘कोविड काळात’ आपले अमूल्य योगदान देणारे बँकेचे ग्राहक डॉ. परीक्षित बावीस्कर, तिरुपती कंडक्टरचे संचालक अतुल अग्रवाल, जोशी मेडिकल्सचे गोविंद जोशी, शीतल कलेक्शनचे मनोहर नाथानी, दालमिल व्यावसायिक पंकज ब-हाटे व सुवाद्य तुतारी वादक लक्ष्मण अंभोरे, शाहीर सखाराम जोशी यांचे नातू शाहीर संग्राम जोशी, विवेकानंद शाळेतील शिक्षक व दिनदर्शिकेतील माहिती ज्यांनी एकत्रित केली असे ज्ञानेश्वर पाटील व दिनदर्शिकेतील शूर मावळ्यांचे स्केच ज्यांनी साकारले असे नितीन सोनवणे व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी केशवस्मृती सेवा समूहाचे अध्यक्ष भरत अमळकर, बँकेचे अध्यक्ष अनिल राव, उपाध्यक्ष डॉ.प्रताप जाधव, बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला, केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, बँकेचे संचालक सतीश मदाने, सुरेश केसवाणी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, कर्मचारी,अधिकारी व केशवस्मृती परिवारातील सदस्य उपस्थित होते. सभासदांसाठी विविध योजना राबविणाऱ्या जळगाव जनता बँकेच्या वतीने सभासदांसाठी दरवर्षी अतिशय आकर्षक अशा दिनदर्शिकेचे वितरण करण्यात येते.
सन २०२१च्या दिनदर्शिकेत बँकेने स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीने जिवाची पर्वा न करता लढा देणाऱ्या शूर मावळ्यांची विस्तृत माहिती समाजाला व्हावी या आनुषंगाने माहिती विषद केली आहे.
यात बहिर्जी नाईक, प्रतापराव गुजर, कोंडाजी फर्जद, कान्होजी जेधे, मुररबाजी देशपांडे, फिरंगोजी नरसाळा, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लीम सरदार, बाजी पासलकर, जिवा महाला, हिरोजी इंदलकर यांसारख्या शूर मावळ्यांच्या पराक्रमाची माहिती दिनदर्शिकेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे दिनदर्शिकेत सर्व शाखांचे फोन नंबर तसेच कार्यालयीन वेळेची, माहिती, तिथी, वार, नक्षत्र इ.ची माहिती तसेच केशवस्मृती समूहातील विविध प्रकल्पांची माहिती तसेच प्रकल्पप्रमुख, प्रकल्प सहप्रमुख व व्यवस्थापक व
त्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील यांनी केले, तर उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव यांनी शिवरायांचे मावळे व त्यांचा महिमा विषद केला. आभार प्रदर्शन संचालक अधिकारी अतुल नाईक यांनी केले. सूत्रसंचालन अधिकारी स्वाती भावसार यांनी केले. दिनदर्शिकेचे वितरण गुरुवार (दि.३१) पासून झाले असून, सभासदांना बँकेच्या मुख्य कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध होणार आहेत, असे बँकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.