जळगाव : कोरोना चाचणी प्रयोगशाळेच्या आयटीपीसीआर या मुख्य मशिनला नागपूर एम्सकडून गुरुवारी क्वालीटी कंट्रोलचे प्रमाणपत्र मिळाले असून लवकरच या ठिकाणी १३५ अधिक रुग्णांचे नमुने तपासणे शक्य होणार आहे़ दरम्यान, प्रयोगशाळा शुक्रवारीच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनीही दिली आहे़एका शिफ्टमध्ये ४५ असे तीन शिफ्टमध्ये १३५ नमुने या प्रयोगशाळेत तपासता येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले़ दरम्यान, आरटीपीसीआर या मुख्य मशीनची धुळे येथून नमुने मागवून चाचणी घेण्यात आली होती़ नमुन्यांचे अहवाल धुळे येथे पाठविण्यात आले होते़ ते तत्काळ नागपूर एम्स येथे जाऊन तेथून जळगावच्या प्रयोगशाळेला गुरुवारी गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले़ दिल्ली येथून नंबर आल्यानंतर पुणे येथे किटसाठी मागणी नोंदविली जाणार आहे़ त्यानंतर या ठिकाणी नमुने तपासणी सुरू होणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली़मृत संशयितांचा तीन तासात अहवालगुरुवारी एका कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाला होता़ सीबी नॅट मशीनवर नमुने तपासून तीन तासात महिलेच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त होऊन निगेटीव्ह आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला़ मुख्य मशिनवर नमुने तपासणी सुरू होत नाही, तोपर्यंत सीबी नॅट या मशिनवर आपत्कालीन नमुने तपासणे शक्य होणार आहे़ त्यामुळे अहवाल प्रलंबित राहण्याच्या विषयातून रुग्णांना दिलासा मिळणार आहे़
कोरोना प्रयोगशाळेला नागपूरचे एम्सचे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:52 PM