लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून यात आता काही तांत्रिक बाबी समोर येत आहेत. अनेकांना काही तांत्रिक अडचणीमुळे पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळल्यास त्यांनी दुसऱ्या डोससाठी काय करावे असा एक प्रश्न यातून समोर आला आहे. यात अनेकांनी दोन डोसच्या वेळी दोन वेगवेगळे मोबाईल क्रमांक दिल्याने त्यांची नोंद ही पहिल्या डोसमध्येच झाल्याचेही काही प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे दुसऱ्या डोसच्या वेळी काहींना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पहिल्या डोसचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्या ठिकाणी रजिस्टर क्रमांक नमूद असतो, या क्रमांकानुसारच तुम्ही डोस कधी घेतला, तुमचा पुढील डोसची तारीख काय याची सविस्तर नोंद असते. त्यामुळे हा क्रमांक किंवा तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर नसेल तर दुसरा डोस घ्यायला अडचणीचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात ६ लाखांवर लसीकरण पूर्ण झाले आहे. लस पुरवठा कमी होत असल्याने काही प्रमाणात खंड असला तरी लस आल्यानंतर आता केंद्रांवर गर्दी वाढली आहे. एका दिवसाला २५ हजारापर्यंत लसीकरण होत आहे.
आतापर्यंत झालेले लसीकरण: ६८५३५९
पहिला डोस : ५३८७७८
दुसरा डोस : १४६५३१
लसीकरणावेळी ही घ्या काळजी
१ नोंदणी करताना शक्यतोवर स्वत:चा मोबाईल क्रमांक द्यावा
२ स्वत: कडे मोबाईल नंबर नसल्यास अगदी जवळच्या नातेवाईकाचा नंबर द्यावा
३ लसीकरणानंतर प्रमाणपत्र लागलीच डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यावी
४ प्रमाणपत्रावरील नोंदणीक्रमांक लिहून ठेवावा.
पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास पहिल्या डोसनंतर तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र न मिळाल्यास मोबाईल क्रमांकावरून लॉगईन करून संबधिताच्या डोससंदर्भात सर्व माहिती उपलब्ध होत असते. आणि अशा वेळी मोबाईल क्रमांकही चुकला असेल तर मग ज्या केंद्रावर लस घेतली होती. त्या केंद्रावर जावून त्या ठिकाणी त्या तारखेनुसार नोंद आहे का हे बघून माहिती घ्यावी लागते.
प्रतिक्रिया
मोबाईल नंबरच बदलला
पहिल्या डोसच्यावेळी वेगळा मोबाईल नंबर दिला होता. मात्र, दुसऱ्या डोसच्या वेळी तो नंबरच आठवत नसल्याने दुसऱ्या डोसच्या वेळी दुसरा नंबर द्यावा लागला, मात्र, यामुळे प्रमाणपत्र हे पहिल्याच डोसचे प्रमाणपत्र मिळाले. - एक लाभार्थी
तांत्रिक अडचणींमुळे पहिले प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे दुसऱ्या डोसला अडचण आली होती. मोबाईल नंबरवरून अखेर सर्व माहिती घेऊन दुसऱ्या डोसची नोंदणी झाली. मात्र, यात वेळ खूप गेला, आधीच केंद्रांवर गर्दी खूप होत असून लस मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. - एक लाभार्थी
पहिले प्रमाणपत्र नसेल तर ज्या केंद्रांवर आपण पहिला डोस घेतला आहे, त्याच केंद्रांवर जावून दुसरा डोस घ्यावा त्यासाठी त्याठिकाणी आपला मोबाईल क्रमांक दिल्यानंतर आपली माहिती त्या ठिकाणी येते. - डॉ. समाधान वाघ, लसीकरण अधिकारी