- स्टार : ७१३
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना विषाणूचा कहर वाढल्यामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. पण, विद्यार्थ्यांना अकरावीत कोणत्या आधारावर प्रवेश द्यावा याबाबत वरिष्ठ स्तरावर मंथन सुरू आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा विचार शासनस्तरावर सुरू असला तरी परीक्षा नेमकी कशी व केव्हा घ्यायची याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.
कोरोनामुळे गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यावेळीदेखील पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डासह राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. दहावीच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातून सुमारे ५८ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. जळगाव जिल्ह्यात अकरावीच्या ४९ हजार ८० जागा असल्याने प्रवेशासाठी ओढाताण होत नसली तरी शहरातील काही नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड असते. अकरावीच्या प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १०० गुणांची ऑफलाईन सीईटी परीक्षा घेण्याविषयी शिक्षण विभाग चाचपणी करीत आहे. यातील गुणावरच अकरावीचे प्रवेश निश्चित होण्याची शक्यता आहे. मात्र, मोठ्या संख्येने असणाऱ्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा कोरोनाकाळात कशी घ्यायची याचे आव्हान शिक्षण विभागासमोर राहील.
---------
तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय?
दहावी परीक्षेत मिळालेल्या गुणांवरच तंत्रनिकेतन, आयटीआयमध्ये प्रवेश मिळतो. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय निवडण्यात येणार असला तरी तंत्रनिकेतत, आयटीआय प्रवेशासाठी कोणते निकष लावले जाणार? याबाबत पालकांसह विद्यार्थीदेखील संभ्रमात आहेत.
००००००००००००
ऑफलाईन झाली तर कोरोनाचे काय?
कोरोनाकाळात ऑफलाईन सीईटी परीक्षा घेतली तर कोरोना संसर्ग रोखावा कसा? असा प्रश्न प्रशासनासमोर राहील. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, त्यात पुन्हा ऑफलाईन परीक्षा घेतली तर कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-------
ऑनलाईन झाली तर ग्रामीण भागाचे काय?
कोरोनामुळे ऑनलाईन सीईटी घेण्याचा विचार केला तर याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसण्याची सर्वाधिक शक्यता आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नेटवर्क अभाव, तसेच अँड्रॉईड मोबाईल अनेक विद्यार्थ्यांकडे नाहीत. यातून परीक्षेला मुकावे लागण्याची भीतीही आहे़
----------
अंतर्गत मूल्यमापन कसे होणार?
दहावीतील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन बहुतांश शाळांत झाले नाही. ऑनलाईन शिक्षण सुरू असले असले तरी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कसे करायचे. याबाबत अद्याप मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतरच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे शक्य होणार आहे, असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
--------=-=
काय म्हणतात प्राचार्य....
अकरावीचे प्रवेश हे गुणवत्तेनुसार केले जाते. कारण, व्होकेशनल अभ्यासक्रमांना खूप स्पर्धा असते. त्यामुळे मेरीट आवश्यक असते. मेरीट कोणत्या आधारे लावावे हे शासनाने ठरवून द्यावे. आधी आपण दहावीच्या गुणांवर प्रवेश देत होतो. त्यामुळे लवकरात लवकर काही तरी निर्णय जाहीर करावा.
- राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य, धनाजी नाना महाविद्यालय
-----------------
दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता, सक्षम अधिकारी म्हणून तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांचे अद्यापपर्यंत कुठल्याही सूचना प्राप्त झालेल्या नाही. मार्गदर्शन सूचना प्राप्त होताच, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. त्यांनी ११ मे रोजी प्रवेशाकरिता, कुठल्या-कुठल्या कागदपत्रांची आवश्यक आहे, त्याची सूची पाठविलेली आहे. विद्यार्थ्यांनी ही प्रमाणपत्र काढण्याकरिता तयारीत राहावे. जशा सूचना प्राप्त होतील, तशा पालक विद्यार्थ्यांना कळविल्या जातील. स्कूल कनेक्ट उपक्रमातंर्गत साडेसहा हजार विद्यार्थ्यांना डाटा शासकीय तंत्रनिकेतनकडे आहे.
- डॉ. महेंद्र इंगळे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव
-------------------
अकरावी प्रवेशाचे नियोजन हे शासनाच्या धोरणानुसार अवलंबून आहे. मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्यानंतर प्रवेशासंबंधी पुढील कार्यवाही होईल. अजूनही प्रवेशाबाबत संभ्रमावस्था आहे. मागील वर्षी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सुरळीत प्रवेश प्रक्रिया पार पडली. विद्यार्थिनींच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली. यंदा शासनाचा जो निर्णय होईल, त्याप्रमाणे आमची तयारी असेल.
- गौरी राणे, प्राचार्य, अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय
-------------------------------------------
- अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील जागा : ४९,०८०
- एकूण महाविद्यालय - २१८