लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिका प्रशासनाने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर कारवाईसाठी हालचाली सुरु केल्या असताना, दुसरीकडे गाळेधारक देखील आक्रमक झाले आहेत. मुदत संपलेल्या मार्केटमधील अव्यावसायीक समजल्या जाणाऱ्या १६ मार्केटच्या गाळेधारकांनी मनपा प्रशासनाच्या भूमिकेविरोधात मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सकाळी ९ ते ५ यावेळेत पाच जणांच्या गटाकडून या साखळी उपोषणात सहभाग घेतला जाणार आहे.
महापालिका व गाळेधारक हा संघर्ष गेल्या आठ वर्षापासून सुरू आहे. गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत मनपा प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावाला महासभेत बहूमताने मंजूरी मिळाल्यानंतर मनपाकडून आता थकीत भाडे असलेल्या गाळेधारकांचे गाळे ताब्यात घेवून ते लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र, हा निर्णय व ठराव गाळेधारकांना मान्य नसून, त्याविरोधात आंदोलन करण्याची तयारी गाळेधारकांनी सुरु केली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात गाळेधारक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहेत. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा गाळेधारकांनी दिला आहे. साखळी उपोषणात संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वात पहिल्या टप्प्यात पांडुरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, युवराज वाघ हे तर दुसऱ्या टप्प्यात संजय पाटील, पंकज मोमया, वसीम काझी, आशिष सपकाळे, हेमंत परदेशी यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात आंदोलनाला सुरूवात होणार आहे. परवानगी नुसार दररोज वेगवेगळ्या मार्केटचे पाच जण साखळी उपोषणासाठी उपस्थित राहणार आहेत.
मनपाकडून तयारी सुरु
एकीकडे गाळेधारकांनी मनपा प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याची तयारी सुरु केली असताना, दुसरीकडे मनपा प्रशासनाने देखील आता गाळे कारवाईसाठी आपली प्रक्रिया सुरु केली आहे. मनपा प्रशासनाकडून शहरातील मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्याचे काम सुरु केले आहे. थकबाकीदारांची यादी तयार करून, मनपाकडून कारवाई केली जाणार आहे. बडे थकबाकीदार मनपाच्या रडारवर राहणार असून, आठवड्याभरात मनपाकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.