क्राईम स्टोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मेडिकल चालक डॉक्टरनेच रेमडेसिविर इंजेक्शन काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी साखळी तयार केली. मेडिकलमधून २५ हजारात बाहेर निघालेले इंजेक्शन रुग्णांपर्यंत ४० हजारात पोहल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यातील मेडिकल चालकाला अटक झाली असली तरी साखळीतील डॉ.तौसिफ शेख मात्र फरार झालेला आहे.
रेमडेसिविरची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी गुरुवारी पर्दाफाश केला. यात १२ जणांना अटक करण्यात आली असून अजूनही चार जण फरार आहेत.
रस्त्यावर चालताफिरता थाटला धंदा
पकडण्यात आलेल्या टोळीने रस्त्यावर चालता फिरता धंदा सुरु गेला होता. भास्कर मार्केट, रामानंदनगर, पांडे चौक, स्वातंत्र्य चौक यासह इतर ठिकाणी रुग्णांच्या नातेवाइकांना बोलावून या इंजेक्शनची विक्री केली जात होती. एखाद्या अज्ञात ठिकाणी इंजेक्शन ठेवून त्याच परिसरात विक्री करणारा थांबायचा. रुग्णाच्या नातेवाईकांना तिथून हे इंजेक्शन उचलायला लावायचे व तेथेच पैसे ठेवायला सांगितले जायचे तर काहीजण ऑनलाइन पेमेंट करायचे.
रेमडेसीविर इंजेक्शनची शासकीय किंमत १२०० रुपये असतांना तब्बल २६ ते ४० हजार रुपयांत विक्री केली जात होती. पोलीस पथकाने नजर ठेवून गुरुवारी दुपारी भास्कर मार्केटमध्ये टोळीचा पर्दाफाश केला. प्रारंभी येथून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले, त्यांच्याजवळ तीन इंजेक्शन मिळून आले. त्यानंतर वेगवेगळ्या भागातून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. रात्री हा आकडा १२ च्या घरात गेला.
संशयितांचा आकडा वाढण्याची शक्यता
या साखळीतील आरोपींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचा जीव जात आहे तर दुसरीकडे त्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळ्याबाजारात चढ्या दराने त्याची विक्री केली जात आहे. पाचोरा चाळीसगाव या भागात हे इंजेक्शन ४० हजाराच्यावर विक्री झालेले आहे. जळगाव शहरातही ६० ते ८० हजारात विक्री केल्याचे बोलले जात आहे.