कजगाव, ता. भडगाव : तितूर नदीला २५ रोजी पंचवीस दिवसांत चाैथा महापूर आल्याने तितूर नदीकाठावरील शेतकऱ्यांना धडकीच भरत आहे. कारण दि. ३१ला आलेल्या महापुराने तोंडी आलेला घास वाहता केला. पुन्हा दि. ८ रोजी दुसरा महापूर, दि.२१ च्या रात्री आलेल्या पुराने इजा बिजा तिजा करीत हॅटट्रिक साधली. पुन्हा २५च्या रात्री चाैथा पूर आल्याने तितूर पट्ट्यातील ग्रामस्थांमध्ये धडकी भरली आहे. कजगाव नागद हा मार्ग, घुसर्डी पासर्डी हा मार्ग दि. २५च्या पुराने बंद करून टाकला आहे.
अगोदर या भागात अडीच महिन्यांची पावसाने दांडी मारली. ‘ब्रेक के बाद’ पडणाऱ्या पावसामुळे पिके जोमात होती. मात्र दि. ३१ रोजी आलेल्या महापुराने तितूर नदीकाठावरील जमिनीतील पिके वाहती झाली. यानंतर दि. ८च्या पुराने उरलेसुरले सारेच वाहत नेले. मध्येच ढगफुटीसारख्या पडणाऱ्या पावसामुळे काही प्रमाणात शिल्लक राहिलेली पिके सडू लागली आहेत. त्यातच अधूनमधून पडणाऱ्या धुवांधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.
लागोपाठ पंचवीस दिवसांत दोन महापूर
दोन दुथडी भरून वाहणाऱ्या पुरांमुळे तितूर नदीकाठावरील शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. महापुराची चर्चा नागरिकांत थांबत नाही, तोच पुन्हा पुराचे आगमन, असा हा खेळ गेल्या पंचवीस दिवसांपासून सुरू आहे.
पुरामुळे अनेक मार्ग बंदच
दि. ३१ रोजी आलेल्या पुरात कजगाव नागद मार्गावरील पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव वाहून गेल्याने हा मार्ग बंद पडला. कजगाव-टाकळी या मार्गावरील फडशी वाहती झाल्याने हा मार्ग बंद पडला. घुसर्डी पासर्डी या दोन गावांमधील लहान पुलाचा काही भाग वाहून गेल्याने हा मार्गदेखील बंद पडला आहे. यात कजगाव-टाकळी या मार्गावर कजगावच्या शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. मात्र, या मार्गावरील फडशी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.
कजगाव नागद मार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने वाहून गेलेल्या भरावाच्या जागी कच्चा भराव करण्यात आला. मात्र, आलेल्या महापुरात हा भराव वाहता झाला. चक्क दोन वेळेस हा भराव वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. या मार्गावरदेखील असंख्य शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. घुसर्डी, पासर्डी या दोन गावांच्या मधून तितूर नदी गेली आहे. या गावातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी नदीवर लहान पूल (फडशी) बनविण्यात आले आहे. मात्र, महापुरात पूल तुटल्याने माती वाळूचा भराव करत हा मार्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, पुन्हा पुन्हा येणाऱ्या पुराच्या प्रवाहात कच्चा भराव वाहत असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे.
दि. २५च्या रात्री आलेल्या पुरामुळे पुन्हा या सर्वच मार्गांवरील वाहतूक बंद पडली आहे. प्रत्येक मार्गावर कच्चा भराव करत हे सारे रस्ते सुरू होतात आणि पूर आला की ते वाहते होतात, असा हा खेळ गेल्या पंचवीस दिवसांपासून सुरू आहे.
260921\26jal_6_26092021_12.jpg
कजगाव नागद मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने हा मार्ग बंद पडला आहे.