चाळीसगाव : शहरातील सोन्या-चांदीच्या दुकानातून दोन भामट्यांनी ६ लाख ६२ हजार रुपये किमतीचे दागिने हातोहात लंपास केले. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजता घडली.
शहरातील अफ्फू गल्ली येथे अरुण मुरलीधर बाविस्कर यांच्या उदय ज्वेलर्स या दुकानात दोन अज्ञात इसम सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शिरले. त्यांनी आम्ही जैन समाजाचे आहोत. आमच्या महाराजांना सोन्या-चांदीचे दागिने भेट द्यायचे म्हणून दागिने दाखविण्यास सांगितले आणि दुकानदाराला बोलण्यात गुंतवले. दुकानदाराने दोघांना विविध प्रकारचे दागिने दाखवले, त्यानंतर त्यांनी एका पिशवीत दागिने भरून बाजूला ठेवले. आमचे महाराज आल्यानंतर आम्ही दागिने घेऊन जाऊ, असे सांगून, त्यापोटी चार हजार रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले. त्यानंतर दोघांनी पाणी मागितले. बाविस्कर हे पाणी घेण्यास जातच प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले ६ लाख ६१ हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन ते पसार झाले.
याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला दोघा भामट्यांविरोधात अरुण मुरलीधर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.