लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : दुसऱ्या लाटेत सुसाट झालेल्या कोरोनाने तालुक्यातील १४२ गावांसह शहरातील सर्व प्रभागांमध्ये विळखा दिला असून बाधितांची संख्या ६ हजार १३१वर पोहचली आहे. एकुण ८७ बाधितांवर कोरोनाने झडप घातली आहे. सद्यस्थितीत ४७९ अॕक्टीव्ह रुग्ण आहे.
चाळीसगाव तालुक्याच्या सीमा औरंगाबादसह नाशिक, धुळे यातीन जिल्ह्यांना स्पर्श करतात. दळणवळणाच्या सुविधा आणि रेल्वेचे जंक्शन स्थानक असल्याने येथे कोरोनाचा उद्रेक होईल. अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र येथे कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्यावर्षी १२ एप्रिल रोजी आढळला होता. गतवर्षी भडगाव येथे निघालेल्या तथाकथित अंत्ययात्रेत सामील झालेल्या एका महिला रुग्णाच्या व्दारे कोरोनाची चाळीसगावी एन्ट्री झाली. पुढे १३ रुग्णांनी कोरोनावर मात करुन चाळीसगावच्या कपाळावर 'कोरोनामुक्तीचा' ठसाही कोरला. मात्र हे भूषण अल्पजीवी ठरले. सद्यस्थितीत तालुक्यातील १४२ गावांसह शहरातील १७ प्रभागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे.
१४२ गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण
कोरोनाच्या पहिली लाट अस्तेकदम आली. बाधितांची संख्या देखील रोडावली होती. मात्र फेब्रुवारीच्या पंधरवाड्यात नागरिकांच्या बेपर्वावृत्तीमुळे कोरोनाने येथे मुक्कामच ठोकला. आरोग्य विभागाने नुकताच तालुक्यातील १४२ गावांचा आढावा घेतला. यात प्रत्येक गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून आले आहे. काही गावांमध्ये अॕक्टीव्ह रुग्ण असून काही गावांमधील रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तथापि कोरोना नाही, असे एकही गाव तालुक्यात राहिलेले नाही. तालुक्यात १४२ गावे असून ११० ग्रामपंचायती आहेत.
कोरोना रुग्ण सहा हजारी
मास्क न वापरणे, विवाह सोहळ्यांना होणारी गर्दी, सुरक्षित अंतराचा फज्जा यामुळे कोरोना रुग्णांची साखळी मध्यंतरी वाढली. सोमवार पासून दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू झाली असून वीकेंड लॉकडाऊनही जाहिर करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या ६१३१ एवढी झाली असून सोमवार अखेर ५५६५ बाधितांनी कोरोनाला परतवून लावले आहे. एकुण ८७ बाधितांची विकेट कोरोनाने घेतली आहे.
तालुकाभरात ४७९ ॲक्टीव्ह रुग्ण
सद्यस्थित धुळे रोड स्थित कोरोना उपचार केंद्रात ३८ रुग्णावर उपचार सुरु आहे. संपूर्ण तालुक्यात ४७९ अॕक्टीव्ह रुग्ण असून ४४१ बाधित खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्यदायी आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.