ऑनलाइन लोकमत
चाळीसगाव (जळगाव), दि. 1 - न्यू बालाजी हॉस्पिटलचे डॉ.राहुल पाटील यांना नगरसेवकासह अन्य एकाने ३० रोजी रात्री साडेअकरा वाजता हॉस्पिटलमध्ये जाऊन मारहाण केली व शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कडक कारवाईची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिका-यांनी पोलिसांकडे केली आहे.
गेल्या महिन्यात दोन गटात हाणामारी झाली होती. यातील गंभीर रुग्ण मुन्ना शहा यास न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले होते. येथून त्यास धुळे येथे पाठवल्यानंतर धुळ्यात या रुग्णाचा मृत्यू झाला होता.
मुन्ना शहा यास उपचार न करता त्याला मेलेल्या स्थितीतच धुळे येथे हलवण्यात आले होते, असे संबंधितांचे म्हणणे असून याबाबतची विचारणा त्यांनी डॉ.पाटील यांना केली असता डॉ.पाटील यांनी उद्या सकाळी येवून माहिती घेवून जाण्यास सांगितले.
नंतर दोघांत शाब्दिक चकमक झाली आणि डॉ.पाटील यांना मारहाण करण्यात आली. घटना घडल्यानंतर डॉ.पाटील यांनी पोलीस स्टेशन गाठले व घटनेची माहिती दिली. दुस-या दिवशी याबाबत पुरवणी तक्रार दिली असून या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान इंडियन मेडिकल असोशिएनचे सचिव डॉ.विनोद कोतकर, डॉ.सी.टी.पवार, डॉ.कर्तारसिंग परदेशी, डॉ.जयवंत देवरे, डॉ.उज्वला देवरे, डॉ.अभिजित पाटील, डॉ.शशीकांत राणा, डॉ.मुंदडा, डॉ.बाविस्कर, डॉ.शैलेंद्र महाले आदी पदाधिका-यांनी पोलीस अधिका-यांची भेट घेवून संबंधितांविरुद्ध डॉक्टरसाठीच्या संरक्षण कायद्यानुसार कारवाईची मागणी केली आहे.