ठळक मुद्देसंडे हटके बातमी विजय शर्मा यांचा अनोखा उपक्रमभीक मागणा-या मुलांचेही प्रबोधन दर रविवारी करतात सहा तास स्वच्छता
चाळीसगाव : नोकरीचा रतिब घालणा-या कुणालाही सप्ताहातील 'संडे' एन्जाय करण्यासह किंवा घरातील उरली - सुरली कामे करण्यासाठी घालवायचा असतो. चाळीसगाव बस आगारातील चालक विजय शर्मा मात्र याला अपवाद ठरतात. दर रविवारी ते सहा तास शहराच्या विविध भागात स्वच्छता करतात. त्यांच्या या सुसाट धावत असलेल्या स्वच्छता एक्सप्रेसची आता चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. गत दोन वर्षापासून ही एक्सप्रेस विनाखंड धावते आहे, हे विशेष. दोन वर्षापूर्वीचा प्रजासत्ताकदिन विजय मदनलाल शर्मा यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. याच दिवसापासून त्यांनी सार्वजनिक ठिकाणे स्वच्छता करण्यासाठी उचललेला 'झाडू' गत दोन वर्षात अजूनही खाली ठेवलेला नाही. भीक मागणा-या ५० मुलांचे प्रबोधन करुन ३० मुलांना त्यांनी शाळेची वाट दाखवली आहे. ४६ वर्षीय विजय शर्मा हे घाटरोडलगत वास्तव्यास आहे. २००४ मध्ये ते परिवहन मंडळात चालक पदावर रुजू झाले. तारुण्यातच त्यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली. वेळ मिळेल तेव्हा यात सहभाग घेत. मात्र दोन वर्षापूर्वी २६ जानेवारी २०१८ रोजी त्यांनी तिरंग्या ध्वजासमोर सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्याचा संकल्प केला. दर रविवारी पाच ते सहा तास ते स्वच्छता मोहिमेसाठी देतात. गेल्या दोन वर्षात शहरातील विविध ठिकाणे त्यांनी स्वच्छतेव्दारे लख्ख केली आहे. विजय शर्मा यांची सार्वजनिक स्वच्छता मोहीम चाळीसगावकरांसाठी कौतुकाचा व आदराचा विषय झाला आहे. कौतुक होवो की हेटाळणी. रविवार, झाडू आणि विजय शर्मा यांचा संकल्प यात खंड पडलेला नाही. स्वच्छता करताना त्यांच्याबरोबर कुणी फोटो काढून घेतो, तर कुणी त्यांची चौकशी करतो. शर्मा मात्र आपल्या कामात दंग असतात.अण्णा हजारे यांची भेट ठरली प्रेरणादायीराळेगणसिद्धी येथे समाजसेवक अण्णा हजारे यांना पाहण्यासाठी गेलेले विजय शर्मा त्यांच्या चळवळीने भारावले. पुढे अण्णांच्या वेगवेगळ्या आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला. काही प्रश्नांबाबत त्यांनी अण्णांशी पत्रव्यवहार केला आहे. शर्मा यांची समाजसेवी वृत्ती पाहून अण्णांनीदेखील प्रतिसाद म्हणून त्यांना पत्र लिहिले आहे. चाळीसगावात ते 'मेरा गाव मेरा तीर्थ' या नावाने स्वच्छता मोहीम राबवतात. बसस्थानक, गल्ल्यांमधील गटारे, दुभाजकांमधील घाण, स्मशानभूमी, कब्रस्थान, रेल्वेस्थानक, रेल्वे पूल, रस्ते आदी ठिकाणी ते रविवारी स्वच्छतेसाठी हजर असतात. भीक मागणा-या मुलांचे प्रबोधनशाळकरी वयात हातात पाटी -पेन्सिली ऐवजी भिकेचे कटोरे असणा-या मुलांना हुडकून काढून विजय शर्मा त्यांच्या पालकांचे प्रबोधन करतात. यासाठी ते थेट अशा मुलांचे घर गाठून पालकांची समजूत काढतात. गत दोन वर्षात ६० मुलांच्या घरी त्यांनी भेटी देऊन ३० मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. खान्देश जनआंदोलन समितीचे अध्यक्ष व साहित्यिक प्रा.गौतम निकम यांच्यासोबतही ते सामाजिक व शैक्षणिक कार्यात सहभाग घेतात. टाळेबंदीत विकले 'इडली आणि सांबर'टाळेबंदीत बस थांबल्या. पगारही थांबले. कुटुंबाची उपासमार होऊ लागल्याने शर्मा यांनी तीन महिने बसस्थानकाच्या प्रवेशव्दारावर इडली-सांबरचा स्टाॕल लावून संसाराचा गाडा पुढे ओढला. याच कालावधीत दरदिवशी ३० ते ३५ गरजू मजुरांना त्यांनी स्वखर्चाने जेवण उपलब्ध करून दिले. गेल्या १७ वर्षापासून परिवहन महामंडळात 'विना अपघात चालक' म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. सेवेचा भाव ठेवून स्वच्छतेचा केलेला संकल्प शेवटच्या श्वासापर्यंत पाळायचा आहे. नोकरी आणि सेवा यांची सांगड घालून काम करतो. भारतीय नागरिक असल्याचा अभिमान आहे. अण्णा हजारे यांच्यामुळेच प्रेरणा मिळाली. प्रा.गौतम निकम हे संघर्ष करण्यासाठी बळ देतात. चाळीसगावकरांचे कौतुक उत्साह वाढवते.-विजय मदनलाल शर्मा, चालक, परिवहन महामंडळ, चाळीसगाव आगार.चाळीसगावच्या चालकाची ‘संडे स्वच्छता एक्सप्रेस’ सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 3:17 PM