लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या जहागिरदारवाडीकडे जाणाऱ्या बामोशी बाबा दर्गाहजवळील डोंगरी नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन अखेर रविवारी सकाळी ९ वाजता नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्याहस्ते झाले. यामुळे परिसरातील रहिवाश्यांनी समाधान व्यक्त केले असून पाच ते सहा हजार लोकसंख्येची मोठी गैरसोय टळणार आहे.
यासाठी नगरसेवक सूर्यकांत ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. बामोशी बाबा दर्गाह परिसराच्या लगत हनुमानसिंग नगर, जहागिरदारवाडी, हरिगिरीबाबा नगर असा मोठा रहिवास असून येथील रहिवाश्यांना डोंगरी नदीतून वाट काढत घर गाठावे लागते. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास संपर्क तुटतो. गेल्या अनेक वर्षापासून परिसरातील नागरिकांची नदीवर पुल बांधण्याची मागणी होती. याच मार्गाने कोदगावकडेही जाता येते. अखेर प्रभागाचे नगरसेवक व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सूर्यकांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून पुलाच्या कामाचे भूमिपुजन रविवारी झाले.
यावेळी नगरसेविका सविता राजपूत, माजी नगरसेवक प्रदीप राजपूत, बाबा पवार, विश्वास चव्हाण, चंद्रभागा गुरव, रमेश गुरव, वीरेंद्र राजपूत, डॉ. दिलीप जोशी, तुकाराम राजपूत, रूपसिंग राजपूत, रामकृष्ण राजपूत, भाऊसाहेब देशमुख, साजिद जहागिरदार, फिरोज जहागीरदार, सागर पाटील, महिंद्र शितोळे सोनवणे,एकनाथ बोरसे, जयदीप देशमुख, पप्पू राजपूत, सोमसिंग राजपूत, फकिरा मुजावर, नासिर मुजावर उपस्थित होते.
जिल्हा नियोजन मंडळाकडून ५३ लाखाचा निधी
नगरसेवक व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सूर्यकांत ठाकूर यांनी ही समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडून जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतर्गंत ५३ लाख १९ हजार ७८६ रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला. पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची ही समस्या सोडविण्यात यश आले. निधीही मंजूर झाला. रहिवाशांची कायमस्वरुपी गैरसोय दूर होणार आहे, अशी प्रतिक्रिया सूर्यकांत ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.