चाळीसगाव : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी पाणी पुरवठा विभागातील 'व्हॉल्व्ह’ खरेदीतील भ्रष्टाचारावरुन जोरदार रणकंदन माजले. या एकाच विषयावर सभेत दोन तास खडाजंगी झाली. व्हॉल्व्ह खरेदी व वापराबाबत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी गटाचे नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी करुन एकप्रकारे घरचा आहेर दिला. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी हे आरोप फेटाळून लावत आपण न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले असा खुलासा केला.सभेला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. सभेत सुरुवातीलाच व्हॉल्व घोटाळ्याप्रकरणी चर्चेला तोंड फुटले. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याची मागणी घृष्णेश्वर पाटील यांनी नगराध्यांक्षाकडे केली असता नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी अशी समिती नेमण्याचा आपणाला अधिकार नसून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, तेच निर्णय घेऊ शकतील असे सांगितले. सभेत एकूण ३६ विषय मांडण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा आशालता चव्हाण होत्या. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्यासह सत्ताधारी व विरोधी गटाचे नगरसेवक उपस्थित होते.सत्ताधारी गटाचे नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी पाणी पुरवठा विभागातील व्हॉल्व्ह खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून सभागृहात खळबळ उडवून दिली.नगरपालिकेला व्हॉल्व्ह खरेदीची गरज नसताना तसेच प्रत्यक्षात अशी कुठलीही खरेदी झालेली नसताना बोगस कामे दाखवून खोटे स्टॉक रजिस्टर मेन्टेन करून कोट्यवधी रूपयांची बिले संबंधित ठेकेदाराला अदा केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.ही सर्व बिले ठेकेदाराला देण्याबाबत मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचा वैयक्तिक इंटरेस्ट असल्याचा ठपका ठेवत, तुम्ही भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहात आणि ठेकेदारांचे भले करून नागरिकांच्या पैशाचा अपव्यय करीत आहात. असे एका पाठोपाठ एक आरोप केले. घृष्णेश्वर पाटील यांच्या या आरोपाने काही वेळ सभागृहात स्मशान शांतता पसरली. त्यावेळी सत्ताधाऱ्यांसह विरोधी नगरसेवकांनी पाटील यांनी केलेले आरोप गांभीर्याने घेत आश्चर्य व्यक्त केले.शहर विकास आघाडीचे राजीव देशमुख यांनी अशा प्रकारची अनियमितता असेल तर मुख्याधिकाºयांनी लक्ष घालावे असे सांगितले. नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी मागील कुठलेही बिलांची रक्कम अदा करण्यापूर्वी ही बिले सभागृहासमोर ठेवावी अशी सुचना केली. या गंभीर आरोपाबाबत मुख्याधिकारी अनिकेतन मानोरकर यांनी स्पष्टीकरण मांडावे असे मत सदस्यांनी व्यक्त केले. त्यावर मानोरकर यांनी स्पष्टीकरण दिले.चर्चेत अण्णा कोळी, सुरेश स्वार, रामचंद्र जाधव, सुर्यकांत ठाकूर, दीपक पाटील, नितीन पाटील, गटनेते संजय रतनसिंग पाटील यांनी सहभाग घेतला. सभेत एकाच विषयावर दिर्घकाळ चर्चा होत असल्याने पत्रिकेवरील अन्य विषयांवर चर्चा घ्यावी. अशी सुचना काही नगरसेवकांनी केली. घृष्णेश्वर पाटील यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नगराध्यक्षांनी चौकशी समिती नेमावी अशी मागणी केली.