चाळीसगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चाळीसगावची वाटचाल 'डेंजर झोन'कडे होऊ लागली असून सद्य:स्थितीत शहरातील दहाहून अधिक कोरोनावर उपचार करणारे हॉस्पिटल्स रुग्णांनी फुल्ल झाले आहे. दरदिवशी शंभराहून अधिक रुग्ण उपचार घेण्यासाठी खासगी हॉस्पिटल्समध्ये दाखल होत असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोना उपचार केंद्रात २०० बेडची व्यवस्था उपलब्ध असल्याची माहिती तालुका कोविड नोडल अधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी 'लोकमत'ला दिली. चाळीसगाव परिसरात कोरोनाच्या पहिल्या लाटेत पहिला रुग्ण गेल्या एप्रिल महिन्यात आढळला होता. गेल्या ११ महिन्यात बाधितांची संख्या पाच हजाराहून अधिक झाली आहे. दुस-या लाटेत कोरोना स्प्रेड झाल्याने दरदिवशी बाधितांच्या संख्या वाढत आहे. शहरात १० हॉस्पिटल्समध्ये कोरोनावर उपचार करण्याची परवानगी आरोग्य विभागाने दिली आहे. 'लोकमत'ने शुक्रवारी या हॉस्पिटल्सचा आढावा घेतला असून येथे रुग्णांची संख्या फुल्ल झाली आहे. बाधित रुग्णांना अॕडमिट होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून उद्रेक कोरोना अटोक्यात येत असतानाच फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून त्याचे पुन्हा ‘कमबॕक’ झाले. १० मार्चपर्यंत बाधितांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले. १३ व १४ रोजी जनता कर्फ्यू लावला गेला. सुरक्षित अंतराचा फज्जा, वाढणारी गर्दी, मास्क न वापरण्याची बेफिकरी यामुळे कोरोनाचा येथे उद्रेक झाला आहे. दरदिवशी दोन अंकी संख्येत बाधित आढळून येत आहेत. शासकीय उपचार केंद्रांमध्ये २०० बेडची व्यवस्था धुळेरोडस्थित महात्मा फुले आरोग्य संकुलातील कोरोना उपचार केंद्रात अॉक्सीजनची सुविधा असणारे ५० बेड आहे. यापैकी पाच बेडवर व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे. ५० साधे बेड असून भडगाव रोडस्थित मुलींच्या वसतिगृहात ५० बेड आहे. धुळे रोडस्थित शासकीय मुलींच्या वसतिगृहातही ५४ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ७१ रुग्णांवर सुरू आहेत उपचार भडगाव रोडस्थित मुलींच्या वसतिगृहातील उपचार केंद्रात सद्य:स्थितीत ग्रामीण भागातील १८ तर शहरातील १४ अशा एकूण ३२ कोरोना बाधितांवर उपचार केले जात आहे. धुळे रोडस्थित कोरोना उपचार केंद्रात शहरातील १९ व ग्रामीण भागातील २० असे एकूण ३९ बाधित उपचारासाठी दाखल आहेत. लसीकरणाला प्रतिसाद कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत असून ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने यासाठी नोंदणी केली आहे. कोरोना उपचार केंद्रासह दोन खासगी हॉस्पिटल्समध्येही लसीकरणाची सेवा उपलब्ध आहे. लवकरच नगरपालिकेतही लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात १० प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही लसीकरण केले जात आहे.
चाळीसगावला खासगी हॉस्पिटल्स फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 2:16 PM
चाळीसगावला खासगी हॉस्पिटल्स फुल्ल झाले आहेत.
ठळक मुद्देकोरोनाची दुसरी लाट मोठीकोरोना उपचार केंद्रात २०० बेडची व्यवस्थाबाधित होण्याचे प्रमाण वाढले