चाळीसगावः मेहुणबारे पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणूकीत पुन्हा भाजपाचा विजय झाला असून 'कमळ' फुलले आहे. निवडणुकीचा निकाल सोमवारी सकाळी ११ वाजता जाहिर करण्यात आला. भाजपाच्या सुनंदा सुरेश साळुंखे यांनी राष्ट्रवादीच्या जयश्री नरेश साळुंखे यांच्यावर १३४५ मतांची आघाडी घेत त्यांना पराभवाचे आस्मान दाखविले. पोटनिवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष एकवटले होते. पोटनिवडणुकीमुळे पं.स.मधील पक्षीय बलाबल समान झाले आहे.मेहुणबारे गणाच्या भाजपाच्या सदस्या रुपाली पियूष साळुंखे यांच्या निधनानंतर दहा महिन्यांनी पोटनिवडणुक झाली. गेल्या दहा महिन्यांपासून पं.स.सभागृहात भाजपा अल्पमतात होता. एकुण १४ सदस्या पैकी राष्ट्रवादीला सात आणि भाजपालाही सात जागा मिळाल्या होत्या. पोटनिवडणुकीतील विजयामुळे पक्षीय बलाबल आता पुन्हा समान झाले आहे. अॉगस्ट महिन्यात सभापतीपदाचे आरक्षण जाहिर होण्याची शक्यता झाल्याने राष्ट्रवादीसह भाजपानेही हा सामना प्रतिष्ठेचा केला होता. अडीच वर्षापूर्वी सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला तांत्रिक चूक भोवल्याने ही दोघे पदे भाजपाला मिळाली. पं.स.वर कमळाचे निशाण फडकले.पोटनिवडणुकीसाठी २३ रोजी ४६.५५ टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी १० वाजता तहसिल कार्यालयात मतमोजणी होऊन ११ वाजता निकाल जाहिर करण्यात आला. सुनंदा सुरेश साळुंखे यांना ४४६८ तर जयश्री नरेश साळुंखे यांना ३१२३ मते मिळाली. सुनंदा साळुंखे यांनी १३४५ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. विजयी झालेल्या साळुंखे या दिवंगत सदस्या रुपाली साळुंखे यांच्या सासूबाई आहेत. विजयानंतर खासदार उन्मेष पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.हिंगोणे ग्रा.पं.पोटनिवडणुकीचाही निकालहिंगोणे ग्रा.पं.च्या प्रभाग क्र. ३ मध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत प्रमिलाबाई सुरेश पाटील यांनी अवघ्या सहा मतांनी प्रतिस्पर्धी सुनील साहेबराव कोष्टी यांचा पराभव केला. प्रमिलाबाई यांना १३३ तर सुनील कोष्टी यांना १२७ मते मिळाली. २३ रोजी मतदान घेण्यात आले. सोमवारी सकाळी ११ वाजता निकाल जाहिर करण्यात आला.
चाळीसगाव पं.स.पोटनिवडणुकीत भाजपाचे 'कमळ' फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:50 PM