लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : शहर व तालुका परिसरात कोरोना आजारातून बरे होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण दिलासादायक राहिले आहे. तथापि, दुसऱ्या लाटेतील गेल्या ५० दिवसांतही कोरोनाशी फाइट करून पुन्हा स्वगृही परतणाऱ्या नागरिकांचे प्रमाण बाधितांपेक्षा वाढले आहे. ही गूड न्यूज असली तरी, गेल्या ५० दिवसांतच २० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ही संख्या शंभरीपार होऊन १०१ एवढी झाली आहे. सद्य:स्थितीत उपचार घेणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांची स्थिती पाहता ही संख्या वाढण्याची शक्यता अधिक आहे.
चाळीसगाव हे तीन जिल्ह्यांच्या सीमांना स्पर्श करते. त्यामुळे गेल्यावर्षीच्या सार्वजनिक टाळेबंदीनंतर येथे कोरोना रुग्णांचा स्फोट होईल. अशी भीती व्यक्त केली गेली होती. मात्र, कडकोट सीमाबंदी झाल्याने येथे कोरोनाचा शिरकाव धीम्या गतीने झाला. सुरुवातीला ११ बाधित आढळले. त्यांच्यावर योग्य उपचार झाल्याने त्यांनी कोरोनाला हरविले. चाळीसगाव कोरोनामुक्तही झाले. मात्र, हा आनंद अल्पावधीतच हरवला. यानंतर सातत्याने संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या फुगत गेली. शुक्रवारअखेर ६७२९ एवढे बाधित असून ६६७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या ५० दिवसांचा ताळेबंद पाहिल्यास बाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
५० दिवसात २० मृत्यू
पाच मार्च ते २३ एप्रिल या ५० दिवसांत मात्र मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. पाच मार्च अखेर कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८१ होती. २३ अखेर मृत्यूंची शंभरीपार होऊन १०१ संख्या झाली आहे. गत आठवड्यात एकाच दिवशी पाच बाधितांचे मृत्यू झाले. कोरोना आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. हे दिलासादायक असले तरी, मृत्यूंची साखळीही खंडित होणे गरजेचे आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
कोरोनाने मृत्यू होण्यापेक्षा रुग्ण या आजारातून बरे होण्याचा आलेख उंचावला आहे. बाधित रुग्णांनी तात्काळ उपचार घेऊन शासकीय आचारसंहितेचे पालन केल्यास रिझल्ट चांगला मिळतो. कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय उपचार घ्यावेत. लॉकडाऊन काळात विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्क वापरण्याबरोबरच सुरक्षित अंतरही पाळणे अत्यावश्यक आहे.
- डॉ. देवराम लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, चाळीसगाव.