लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : नियोजन कार्यक्रमाचे असो वा शहराचे. ते केल्यास रचनात्मक काम करता येते. शरिरस्वास्थ हेदेखील व्यायामाच्या नियोजनावरच बेतलेले असते. त्यामुळे शरिर तंदरुस्तीसाठी व्यायाय आवश्यक असून दरदिवशी सायकल चालविणे, हा एक चांगला फिटनेस मंत्र आहे. कोरोनाकाळात म्हणूनच सायकलचा वापर वाढला. सायकल चालविल्याने पर्यावरण संवर्धन होऊन इंधन बचतही होते. असे उदबोधन जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी येथे केले.
शनिवारी प्रतापराव पाटील यांनी चाळीसगावी येऊन येथील हौशी सायकलिस्ट ग्रुपमधील सदस्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत ३० किमी पर्यंत सायकलफेरीही केली. भडगाव रोडवर चाळीसगाव ते वाघळीचे हेमाडपंथीय मधुराईदेवीचे मंदीर असा त्यांनी सायकल प्रवास केला. यावेळी त्यांच्या सोबत जळगाव येथील हौशी सायकलिस्ट रुपेश महाजन यांच्यासह चाळीसगाव सायकलिस्ट गृपचे पहिले एसआर टोनी पंजाबी,अरुण महाजन,रवींद्र पाटील यांच्यासह लिलाधार पाटील, जिजाबराव वाघ, प्रितेश कटारिया, सोपान चौधरी,चेतन पल्लन,केतन बुंदेलखंडी , अरुण पटेल, सोनू महाजन, सुशील जैन, दिनेश ठक्कर,महेश महाजन, निलेश कोतकर, निलेश निकम, दीपक देशमुख, सुरेश मंधानी यांनीही सहभाग घेतला.
सायकलफेरीची सांगता मधुराईदेवी मंदिर परिसरात झाली. प्रतापराव पाटील यांनी आजपर्यंत २५ हजार किमी सायकल चालवली असून याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
सायकल चालवा, फीट रहा
यावेळी प्रतापराव पाटील यांनी आपल्या २५ हजार किमी सायकल प्रवासातील काही किस्से सांगितले. सायकल चालविणे हा सर्वांग सुंदर व्यायाम असून यामुळे शरिर तंदरुस्त व बळकट होते. अनेक व्याधी नाहीश्या होतात. गुडगेदुखीचा त्रास कमी होतो. सायकल चालवितांना घ्यावयाची काळजी, आहार याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. चाळीसगाव परिसरात सायकल चालविण्याची चळवळ चांगली रुजते आहे. असे कौतुकही केले. चाळीसगावचे पहिले एसआर सायकलिस्ट टोनी पंजाबी, अरुण महाजन, रवींद्र पाटील यांच्यासह ९०० किमी सायकल चालवून चाळीसगाव तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे व जलप्रकल्पांची परिक्रमा करणारे जिजाबराव वाघ यांचा प्रतापराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.