चाळीसगावः उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी आज सोमवारी उंबरखेडे येथे मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. यात राखीव गटातील पाचही जागांवर विद्यमान सत्ताधा-यांनीच आघाडी घेतली असून कै. रामराव जिभाऊ पाटील व कै. उदेसिंह पवार स्मृती पॕनलचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
रविवारी झालेल्या मतदानात ४६८१ पैकी ४१२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ८८ टक्के असे विक्रमी मतदान झाले. १९ जागांसाठी लढत झाली. ४५ उमेदवार रिंगणात आहेत.सोमवारी सकाळी आठ वाजता संस्थेच्या वसतिगृह सभागृहात १० टेबलवर मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातील सर्व मतपत्रिकांचे संकलन करुन गठ्ठे लावण्यात आले. यानंतर अनु.जाती - जमाती, भटक्या विमुक्त जमाती, महिला राखीव, इतर मागास गटातील मतमोजणी सुरु केली गेली. यात भटक्या विमुक्त जमाती गटात संस्थेचे सचिव उदेसिंग मोहन पाटील यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर मोठी आघाडी घेतली.
इतर मागास गटात संजय पाटील यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी पं.स.चे माजी सभापती व विरोधी पॕनलचे प्रमुख रवींद्र चुडामण पाटील यांच्यावर आघाडी मिळवली आहे. महिला राखीव गटात अनिता पाटील, साधना निकम तर अनु. जाती - जमाती गटात वर्षा कोळी हे स्मृती पॕनलचे पाचही उमेदवार आघाडीवर आहेत.