चाळीसगाव, जि. जळगाव : विद्यार्थी केंद्रीत अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा प्रयोगशील वापर करताना आ.बं.विद्यालयात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. शुक्रवारी राबविलेल्या स्वाध्यायमाला प्रयोगाने पालकांसह विद्यार्थीदेखील भारावले. सेमी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमाला जोडूनच गणित व विज्ञान विषयाची कार्यशाळा आणि अवांतर पुस्तक वाचनमालेचाही शुभारंभ झाला. उद्घाटन संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांच्या हस्ते झाले.यावेळी व्यासपीठावर शाळा समितीचे चेअरमन अॅड. प्रदीप अहिरराव, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, मु.रा.अमृतकार, राजेंद्र चौधरी, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर, मुख्याध्यापक साहेबराव मोरे, कारुनखाँ तडवी, बा.बा.सोनवणे आदी उपस्थित होते.शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होत असून, विद्यार्थ्यांनी जिज्ञासू होऊन ज्ञान ग्रहण करावे. शिक्षकवृंदानेदेखील अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या मनपटलावर अवांतर ज्ञानाची पेरणी केली पाहिजे. ऐकण्याची सवय ठेवली तर आत्मविश्वासाने बोलता येते. कारकुनी पद्धतीचे नव्हे तर तंत्रज्ञानाचा अंगीकार करणारे शिक्षण आत्मसात करा, असे उद्बोधन प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी केले.शिक्षक मानबिंदू व विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्थेच्या सर्व विभागांमध्ये उपक्रम घेतले जातात. स्वाध्यायमाला व कार्यशाळा उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. पालकांनी पाल्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन नारायणदास अग्रवाल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.प्रास्ताविकात मुख्याध्यापकांनी विविध उपक्रमाची माहिती देऊन स्वाध्यायमाला व कार्यशाळेसह अवांतर पुस्तक वाचनमालेची भूमिका विशद केली. हे उपक्रम सातत्याने सुरु राहणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन किशोर शिरोडे यांनी केले. यावेळी पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
चाळीसगावला स्वाध्यायमालेच्या प्रयोगाने विद्यार्थी भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 2:38 PM
आ.बं.विद्यालयात शुक्रवारी राबविलेल्या स्वाध्यायमाला प्रयोगाने पालकांसह विद्यार्थीदेखील भारावले.
ठळक मुद्देआ.बं. विद्यालयाचा उपक्रमगणित, विज्ञान विषयाची कार्यशाळा