विजयकुमार ठाकुरवाड यांची जळगाव शहर पोलीस स्थानकात बदली झाल्याने नाशिक ग्रामीण पोलीस स्थानकातून बदली होऊन आलेल्या पाटील यांनी बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारला.
तीन जिल्ह्यांची सीमा, जंक्शन रेल्वे स्टेशन, वाढती लोकसंख्या, विस्तारणाऱ्या शहरी सीमा, असे वलय असणाऱ्या चाळीसगावात विशेषतः शहरात चोरटे मुक्कामाला आहेत की काय? असा प्रश्न पडावा. अशा स्वरूपात चोरीच्या व घरफोडीच्या घटना घडत आहेत. मध्यंतरी तर खरजई रोडवरील साडेसतरा लाखांची रोकड असलेले एटीएमच चोरट्यांनी लांबवले होते. याबरोबरच हाणामाऱ्या, दुचाकींच्या चोऱ्या, अशा घटनांचे स्कोअर कार्ड वाढते आहे.
जय बाबाजीनगरातील घरफोडीत चोरट्यांनी हाथ की सफाई दाखवत सात लाख ९७ हजारांचा ऐवज लांबविला. औषधी दुकाने रडावर घेऊन चोरट्यांनी ती फोडली. दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. गत आठ दिवसांत घरफोडीच्या तीन घटना घडल्या आहेत. यातील बहुतांश घटनांचा तपास लागू शकलेला नाही. त्यामुळेच चोरट्यांवर पोलिसांचा वचक बसविण्याचा सूर व्यक्त होत आहे.
शहरात अवैध धंदे आणि त्यातून होणाऱ्या संघटित हाणामाऱ्यांचे प्रकारही वाढले आहेत. या प्रवृत्तींवरही वेळीच जरब बसविणे गरजेचे झाले आहे. लोकसंख्या अधिक आणि पोलिसांची कुमक तोडकी अशी स्थिती येथे असल्याने टोळ्यांमधील संघर्षही वाढला आहे. हाणामाऱ्या, पिस्तूल, तलवार अशी हत्यारे बाळगणे. असे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आवाहन नूतन पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांच्यासमोर असणार आहे.
चौकट
निवडणुकींचाही फीव्हर
या वर्षअखेरीस चाळीसगाव पालिकेच्या संभाव्य निवडणुकीचा बिगुल वाजला असून, पुढील वर्षाच्या सुरुवातीला मिनी मंत्रालय असणाऱ्या जि. प. व पं. स. निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. याबरोबरच जिल्हा बँकेचीही निवडणूक तोंडावर आहे. या निवडणुका चांगल्याच गाजण्याची चिन्हे असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींना चेव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांना कंबर कसावी लागणार आहे.
बोलण्यापेक्षा कृतीवर असेल भर
कांतीलाल पाटील नूतन पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांना पोलीस सेवेतील ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी नागपूर शहरापासून सेवेला सुरुवात केली असून जळगाव ग्रामीण, नाशिक शहर, औरंगाबाद ग्रामीण, नाशिक ग्रामीण आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. प्रत्येक अडचण सोडवू, पोलीस आहेत, असे वातावरण शहरात निर्माण करू. बोलण्यापेक्षा कृतीवर आपला भर असेल. सात दिवस २४ तास नागरिकांसाठी उपलब्ध राहू. दोन दिवस पोलीस स्थानकाची स्वच्छता करून कामाचा श्रीगणेशा करू, अशी प्रतिक्रिया कांतीलाल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.