चाळीसगाव : कोरोना काळात ग्रामीण रुग्णालयास उपचार केंद्रात सेवा देणाऱ्या ३९ आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम थांबविण्याचे आदेश शुक्रवारी देण्यात आल्याने हे कर्मचारी चांगलेच हवालदिल झाले आहेत. त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची कैफियत मांडली आहे. कोरोना काळातील या कर्मचाऱ्यांनी केलेली सेवा लक्षात घेता, याबाबत सोमवारी आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा प्रश्न मांडू, असे चव्हाण यांनी आश्वासित केले आहे.
दीड वर्षापूर्वी कोरोनाची साथ आल्यानंतर आरोग्य यंत्रणांवर चांगलाच ताण पडला. बाधितांची संख्या, उपचारांसाठी होणारी गर्दी यामुळे मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांची निकड निर्माण झाली.
याच काळात येथील कोरोना उपचार केंद्र, राष्ट्रीय वसतिगृहातील विलगीकरण कक्षात ३९ कर्मचाऱ्यांची मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांनीदेखील कोरोनातही जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली.
या कर्मचाऱ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी या कर्मचाऱ्यांची सेवा थांबविण्याचे आदेश दिले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. दुसरी लाट सुरूच असून तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात असतानाच या कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करणे योग्य होणार नाही. कोरोना महामारीत त्यांनी चांगले काम केले आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
चाैकट
संघटनांचा पाठिंबा
जिल्हा व तालुका स्तरावर मानधन तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना नियुक्ती मिळाल्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला होता. कामावरून कमी केल्याचे समजल्याने अनेकांना धक्का बसला. आमचा रोजगार गेल्याने आता यापुढे काय करावे? असा प्रश्न निर्माण झाला असून आम्हाला पूर्ववत कामावर घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्रिदल सैनिक संघटना, जय जवान ग्रुप यांनी कर्मचारी यांना पाठिंबा दर्शविला आहे. कोरोना काळात रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक थांबायचे नाहीत, तेव्हा हे कर्मचारी त्यांची सेवा करीत होते. म्हणून त्यांना न्याय मिळावा, यासाठी अनेक संघटना पाठिंबा देत आहेत.