चाळीसगाव : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी बुधवारी सकाळी १० वाजता रयत क्रांती संघटनेतर्फे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. राज्यभरातील शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न मांडण्यासाठी सदाभाऊ खोत हे राज्यव्यापी दौरा करीत असून, बुधवारी दि. २३ रोजी ते चाळीसगावीही येत आहे. हाॕटेल ग्रीनलीप येथे शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांची वाताहात झाली आहे. याबरोबरच मराठा आरक्षणाबाबतदेखील मार्ग निघालेला नाही. याच विषयावर माजी मंत्री खोत हे शेतकऱ्यांची मते जाणून घेणार आहे.
संवाद मेळाव्यासाठी शेतकरी, मराठा समाजबांधव व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक जुलाल पाटील यांनी केले आहे.