आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि.१८ : तालुक्यातील भुमीपुत्रांनी एकत्र येऊन अंबाजी ट्रेडींग कंपनीच्या माध्यमातून जिल्हा बँकेकडून विकत घेतलेला बेलगंगा सहकारी साखर कारखान्याचा ताबा गुरुवारी सकाळी ११ वाजता माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी जिल्हा बँकेकडून कारखाना स्थळावर घेतला. यावेळी प्रवेशव्दारावर कामगारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या उपस्थित जिल्हा बँकेचे व्यवस्थापक एम.टी.चौधरी व प्राधिकृत अधिकारी पी.टी. सपकाळे यांनी हस्तांतर प्रक्रिया पूर्ण केली.अखेर प्रवेशद्वार उघडले...बेलगंगा साखर कारखाना २००८ मध्ये गळीत हंगाम सुरु असतांनाच जिल्हा बँकेने भाडेकरार रद्द केल्याने कारखान्याची चाके थांबली. यानंतर गेल्या नऊ वर्षात तालुक्याचे राजकारण बेलगंगेभोवती फिरत राहिले. कारखान्याला लागलेले टाळे उघडले गेले नाही. जिल्हा बँकेने राबविलेल्या लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन चित्रसेन पाटील यांनी लोकसहभागातुन ४० कोटी रुपये उभे केले. बँकेकडून कारखाना विकत घेतला. सहा महिन्यांपूर्वी लिलावाची प्रक्रिया पुर्ण झाली. चार दिवसांपूर्वी औरंगाबाद खंडपिठात समोपचार पत्र दाखल केल्यानंतर बँकेने अंबाजी ट्रेडींग कंपनीला विक्री प्रमाणपत्र सुपूर्द केले. त्यानुसार गुरुवारी सकाळी ११ वाजता बँकेने अंबाजी ट्रेडींग कंपनीला कारखान्याचा ताबा दिला. नऊ वषार्नंतर प्रथमच कारखान्याचे प्रवेशव्दार उघडले गेले.'गणपतीबाप्पा मोरया'चा गजरचित्रसेन पाटील यांच्यासह प्रवीण पटेल, कैलास सूर्यवंशी, दिलीप रामराव चौधरी, प्रेमचंद खिंवसरा, यु.डी.माळी, राजेंद्र धामणे, दिनेश पटेल, रवींद्र केदारसिंग पाटील, डॉ.अभिजीत पाटील, नीलेश निकम, अॅड.धनंजय ठोके यांनी कारखाना परिसरातील चिंतामणी गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.रामराव जिभाऊ पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.कारखाना विक्रीस आमचा विरोध नाही. मात्र आमच्या थकीत देण्यांपैकी ५० टक्के रक्कम मिळावी. ही भूमिका घेऊन कामगारांनी प्रवेशव्दाराजवळ विरोध केला. त्यानंतर उपस्थित कामगारांसमोर चित्रसेन पाटील यांनी भूमिका मांडली. २६ रोजी कामगार आणि कारखाना खरेदीदार यांची संयुक्त बैठक घेण्याचे कामगारांनी यावेळी मान्य केले. कारखाना परिसरात असणारी कामगारांची घरे जे कामगार कारखान्यात काम करतील त्यांनाच देण्यात येतील. यावरही एकमत झाल्याने कामगारांचा विरोधही मावळला. त्यानंतर कारखाना परिसरात जेसीबीच्या सहाय्याने लागलीच स्वच्छताही सुरु करण्यात आली.
चाळीसगावच्या 'बेलगंगे'चा ताबा भुमीपुत्रांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 4:11 PM
जिल्हा बँकेच्या हस्तांतरानंतर नऊ वर्षांनंतर उघडले प्रवेशव्दार
ठळक मुद्देनऊ वषार्नंतर प्रथमच कारखान्याचे प्रवेशव्दार उघडले गेले.कामगारांसोबतच चर्चेनंतर मावळला विरोधबेलगंगा कारखान्याच्या संस्थापकांना पुष्पहार केला अर्पण